बालरंगभूमी परिषद जळगाव आणि व.वा.जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर बालकलाकारांचे बहारदार सादरीकरण


जळगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : मराठी बालनाट्य दिवसानिमित्ताने बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे संयुक्तपणे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालकांमध्ये इतिहासाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी, त्यातून या विषयाचे आकलन होऊन त्यांनी वाचन करावे आणि स्वतः संहिता तयार करून सादरीकरण करावे, या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या स्पर्धेसाठी ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य’ हा विषय देण्यात आला होता.

या स्पर्धेत बालकलावंतांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यछटा, स्वगत, नाटुकले, पोवाडा, गीत गायन आणि एकपात्री अभिनय यांसारखे विविध कलाप्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कलावंत प्रतिमा धर्माधिकारी-याज्ञिक आणि सचिन महाजन यांनी अत्यंत निष्णातपणे पार पाडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराज पूजन करून व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व.वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलजी शहा, सदस्य महेशजी गोरडे, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार-गुजराथी, आणि कोषाध्यक्ष सचिन महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.

या स्पर्धेत एकल (वय 5 ते 10 वर्षे) गटात 10 बालकलाकारांनी, एकल (वय 11 ते 15 वर्षे) गटात 15 बालकलाकारांनी, तर समूह सादरीकरणात 7 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकल (वय 5 ते 10 वर्षे) या गटात सर्वोत्कृष्ट – हृदया अनिल चव्हाण (चाळीसगाव), उत्कृष्ट – गायत्री अशोक पवार, उत्तम – महेश्वरी योगेश पाटील, प्रशंसनीय – ईशिका शरीफ तडवी, एकल (वय 11 ते 15 वर्षे) सर्वोत्कृष्ट- वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील, उत्कृष्ट – साक्षी अनिल पाटील, उत्तम- गौरवी महेंद्रसिंग राजपूत, प्रशंसनीय – चैताली सुभाष चव्हाण तर समूह गटात सर्वोत्कृष्ट- ललिता वार्णीें माध्यमिक विद्यालय, जळगाव, उत्कृष्ट- कमल वाणी बालनिकेतन विद्यालय, जळगाव यांनी पारितोषिके पटकावली.

या बालकलावंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व व.वा.वाचनालयाचे एक वर्षाचे सभासदत्वाचे गिफ्ट कार्ड देवून गौरविण्यात आले.सर्व विजयी बालकलावंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि व.वा. वाचनालयाचे एक वर्षाचे निःशुल्क सभासदत्वाचे गिफ्ट कार्ड देऊन गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त बालकलाकारांना अहिल्यानगर येथे 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या महाअंतिम फेरीत सादरीकरणाची संधी मिळणार आहे. सर्व सहभागी बालकलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे सदस्य सुदर्शन पाटील, हर्षल पवार, दर्शन गुजराती, ज्ञानेश्वर सोनवणे, अवधूत दलाल, भालचंद्र पाटील आणि व.वा. वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !