मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या जळगाव जिल्हा मेळाव्यात प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर सखोल मंथन

सेवा, संशोधन, सीएचबी शिक्षक, महिला प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांशी समन्वयावर मार्गदर्शन


जळगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे रविवारी जळगाव येथे जिल्हास्तरीय मेळावा व कार्यशाळेचे आयोजन सोमवार, 3 रोजी करण्यात आले. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत झालेल्या दिवसभराच्या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, सीएचबी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात ‘प्राध्यापकांचा कार्यभार आणि शासनाचे धोरण’ या विषयावर प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक धोरणांचा प्राध्यापकांवरील परिणाम, वाढता प्रशासकीय ताण तसेच उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हानांचे त्यांनी सखोल विश्लेषण केले.

यानंतर महाविद्यालये व विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या विविध समस्या, सूचना आणि संघटनात्मक मुद्द्यांवर मुक्त चर्चा झाली. ‘विद्यार्थी संघटनेच्या दिशेने प्रवास कसा करावा?’ या विषयावर प्रा. डॉ. साहेब पडलवार यांनी विद्यार्थी संघटनांची गरज, नेतृत्व विकास आणि शैक्षणिक चळवळींमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

दुपारच्या सत्रात विनाअनुदानित (सीएचबी) प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि संघटनेची भूमिका याविषयी प्रा. विजय घोरपडे, श्री. भगवान तायडे, श्री. संतोष मनुरे तसेच विद्यापीठातील प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. या सत्रात सीएचबी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आपल्या समस्या मांडत विविध सूचना मांडल्या.

महिला प्राध्यापकांच्या समस्या, कार्यस्थळी येणारी आव्हाने आणि संघटनेतील त्यांचा सहभाग या विषयावर प्रा. डॉ. सुरेखा पालवे (व्यवस्थापन परिषद सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिला प्राध्यापकांनीही आपल्या अनुभवांसह विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.

त्यानंतर ‘मागासवर्गीय प्राध्यापकांच्या संशोधनाची दिशा’ या विषयावर प्रा. डॉ. जयवंत मगर (सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) आणि प्रा. डॉ. विशाल पराते यांनी संशोधनातील गुणवत्ता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संशोधनासाठी उपलब्ध निधी तसेच दर्जेदार संशोधन प्रकाशनाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.

‘समाजकार्य प्राध्यापकांच्या प्रवासात मागासवर्गीय प्राध्यापक संघटना’ या विषयावर डॉ. राहुल निकम यांनी मनोगत व्यक्त केले. समाजकार्य महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे प्रश्न शासन व प्रशासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेने केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

यावेळी संघटनेचे सचिव डॉ. अनिल हिवाळे यांनी ‘मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा’ सादर केला. संघटनेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा, लढ्यांचा तसेच आगामी कृती आराखड्याचा त्यांनी सविस्तर परिचय करून दिला.

समारोपापूर्वी आयोजित मुक्त संवाद सत्रात उपस्थित प्राध्यापकांनी विविध प्रश्न, सूचना व अपेक्षा मांडल्या. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. जयवंत मगर यांनी संघटनात्मक एकजूट, शैक्षणिक गुणवत्ता आणि मागासवर्गीय प्राध्यापकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघटितपणे संघर्ष करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश महाले व प्रा. संजीव साळवे यांनी केले. कार्यशाळेतील सूचना व शिफारसींची नोंद प्रा. डॉ. शरद बिर्‍हाडे आणि डॉ. राजेश सगळगिळे यांनी केली. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विशाल पराते यांनी केले.

या मेळावा व कार्यशाळेत प्राध्यापकांच्या सेवा विषयक प्रश्न, संशोधन, संघटनात्मक बळकटी, सीएचबी शिक्षकांचे प्रश्न, महिला प्राध्यापकांचे प्रश्न तसेच विद्यार्थी संघटनांशी समन्वय अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. भविष्यातील संघटनात्मक कृतीसाठी महत्त्वपूर्ण सूचना पुढे आल्या. जळगाव जिल्ह्यातील तब्बल 168 प्राध्यापकांनी उपस्थित राहून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी प्राध्यापकांनी संघटनेच्या कार्याबद्दल आणि मेळाव्याच्या प्रभावी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !