भुसावळातील विवेकानंद विद्यामंदिरात पालकसभा उत्साहात
भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित विवेकानंद विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील प्रथम सत्र पालकसभा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शिक्षक-पालक संघाची स्थापना करून विविध पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या पालकसभेचे आयोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा खरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक नरेंद्र अकोले, प्रा.डॉ.संजय डी.चौधरी, चेतन शर्मा उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्यातील नैतिक मूल्ये, शिस्त, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि पालकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती देत पालकांनीही आपल्या सूचना व मते मांडली. पालक आणि शिक्षक यांच्यात सकारात्मक संवाद झाल्याने सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिक्षक-पालक संघ स्थापन
या सभेत शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका सुनंदा खरे, उपाध्यक्षपदी रवींद्र मेहरे, सचिवपदी उपशिक्षक सचिन महाजन, सहसचिवपदी शारदा गवते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच संघाच्या विविध सदस्यांचीही निवड करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकार्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
