भुसावळ तालुका ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर रुजू
तीन महिन्यांसाठी राहणार पदभार ; कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कामकाजाचा अनुभव घेणार
भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांची प्रशिक्षणाचा भाग म्हणून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली असून त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे. प्रशिक्षण कालावधीतील या नियुक्तीदरम्यान ते तब्बल तीन महिने भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज पाहणार आहेत.
पोलीस उपअधीक्षक पदाच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. या काळात दरेकर यांना तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे तपास, पोलिसिंगची कार्यपद्धती तसेच विविध प्रकारच्या पोलीस कारवायांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.




भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागातील विविध गावांचा समावेश असल्याने येथील पोलीस प्रशासनासमोरील आव्हानेही वेगळी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून प्रशांत दरेकर यांच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळाकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांकडून कामकाजाची माहिती घेतली. आगामी काळात वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभव घेत पोलीस प्रशासनातील विविध पैलूंचा अभ्यास करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील दरेकर हे रहिवासी आहेत. यावेळी सहकारी कर्मचार्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.