एमआरपीपेक्षा अधिक किंमतीने खाद्य पदार्थांची विक्री : भुसावळ विभागात खानपान स्टॉल विक्रेत्यांनार 7.10 लाखांचा दंड
भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात दर्जेदार खाद्यपदार्थ व पेये उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते तसेच अधिकृत विक्रेत्यांची नियमितपणे आकस्मिक तपासणी केली जात आहे. निर्धारित कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दर आकारणार्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी रेल्वे मदतवर प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विविध स्थानकांवरील खानपान केंद्रांची तपासणी करून व्यावसायिक अनियमितता शोधण्यात येत आहे.




निर्धारित दरापेक्षा अधिक आकारणी केल्यास दंड
तपासणीदरम्यान एखादा विक्रेता निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध रेल्वेच्या नियमानुसार तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. आर्थिक दंडासोबतच प्रकरणाच्या गांभीर्यानुसार इतर शिस्तभंगाची कारवाईदेखील करण्यात येते.
एप्रिल ते जुलै 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत अशा अनियमिततांविरोधात केलेल्या कारवाईत भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाने संबंधित विक्रेत्यांकडून एकूण 7 लाख 10 हजारांचा दंड वसूल केला आहे.
प्रवाशांच्या हितासाठी नियमित देखरेख
प्रवाशांचे हित, ग्राहकांचे अधिकार आणि निर्धारित दरात आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भुसावळ विभागाकडून नियमित देखरेख व आकस्मिक तपासणी सुरू ठेवण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवरील खानपान सेवांमध्ये पारदर्शकता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेगाडीत कोणत्याही खाद्यपदार्थ अथवा पेयासाठी निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास प्रवाशांनी तत्काळ ‘रेल्वे मदत’च्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन भुसावळ विभागाकडून करण्यात आले आहे. तक्रार प्राप्त होताच संबंधित प्रकरणाची पडताळणी करून नियमानुसार कारवाई केली जाईल.