जळगाव जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 13 ऑगस्टला आयोजन
जळगाव (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग तसेच जंगल परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार्या रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील जीवनसत्वे, खनिजे व औषधी गुणधर्म याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी तीन वाजेपर्यंत रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.




रानभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे विविध पौष्टिक अन्नघटक, जीवनसत्वे व खनिजे तसेच औषधी गुणधर्म असतात. रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व आणि त्यापासून तयार होणार्या पाककृतींबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्ड, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग आदी विविध रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत. तसेच शेतकरी व गटांमार्फत अस्सल रानभाज्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तालुकास्तरावरही महोत्सव
तालुकास्तरावरही 9 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत सप्ताह स्वरूपात रानभाजी महोत्सव राबविण्यात येणार आहे. इच्छुक शेतकर्यांनी उपलब्ध मालाच्या तपशीलासह संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत-जास्त नागरिकांनी रानभाजी महोत्सवाला भेट देऊन रानभाज्यांची खरेदी करावी व शेतकर्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्यामार्फत करण्यात आले आहे.