अंजाळे हायस्कूलमध्ये ‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेत वृक्षारोपण
अंजाळे, ता.यावल (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : हरित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अंजाळे हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसह शिक्षक व राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन मदन सपकाळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अंजाळेच्या सरपंच सौ. नलिनीताई यशवंत सपकाळे यांची विशेष उपस्थिती होती.




कार्यक्रमात शाळेचे वरिष्ठ शिक्षक लिलाधर वानखेडे यांनी वृक्षांचे पर्यावरणातील तसेच मानवी जीवनातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारे घटक नसून, भावी पिढ्यांसाठी निरोगी व सुरक्षित जीवनाचा आधार आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्योती परखड, मनोज चौधरी, सुनील सोनवणे व यश चौधरी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वृक्षारोपणामुळे शाळेच्या परिसरात हरित व सुंदर वातावरण निर्माण होण्यास हातभार लागणार असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासही या उपक्रमाची मदत होणार आहे.