भुसावळात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल


भुसावळ (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने व प्रभावी कारवाई करता यावी तसेच सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये उत्तम समन्वय राहावा, यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूस बुधवारी पूर्वनियोजित मॉक ड्रिल घेण्यात आली.

या सरावादरम्यान दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षा व्यवस्था, त्वरित प्रतिसाद, घटनास्थळाची सुरक्षितता, बचाव व मदतकार्य, संभाव्य धोक्याची ओळख आणि वैद्यकीय मदत याबाबत प्रत्यक्ष सराव करण्यात आला.




विविध विभागांचे अधिकारी सहभागी
मॉक ड्रिलमध्ये दहशतवाद विरोधी शाखा, जळगावचे 2 अधिकारी, बॉम्ब शोध व निकामी पथकाचे 6 कर्मचारी व श्वान ‘सिंबा’, भुसावळ अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी, जळगावच्या त्वरित प्रतिसाद पथकाचे 16 कर्मचारी, भुसावळ वैद्यकीय विभागाचे चार कर्मचारी सहभागी झाले. तसेच भुसावळ स्थानक निरीक्षक पवन कुमार यांच्यासह 12 आरपीएफ कर्मचारी आणि शासकीय रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक गोविंदा पांडव यांच्यासह 30 कर्मचारी सहभागी झाले. एकूण 72 अधिकारी व कर्मचार्‍यांनी या मॉक ड्रिलमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

निर्धारित भूमिकेनुसार सर्व विभागांनी तातडीने घटनास्थळी पोहोचणे, परिसराची सुरक्षा करणे, संभाव्य धोका ओळखणे, बचाव व मदतकार्य राबविणे तसेच गरजेनुसार वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचा सराव केला.

मॉक ड्रिल शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडली. या सरावामुळे आपत्कालीन परिस्थितीत विविध सुरक्षा व संबंधित यंत्रणांची तत्परता, परस्पर समन्वय आणि प्रभावी प्रतिसादक्षमता अधिक सक्षम करण्यास मदत झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !