भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली 70 वृक्षांची लागवड
भुसावळ (बुधवार, 10 ऑगस्ट 2026) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहरातील के. नारखेडे विद्यालयाच्या वतीने शेत परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या 70 रोपांची लागवड करण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका व संगणक विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व, पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांची भूमिका तसेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.




झाडे लावणे ही सुरुवात, तर त्यांचे संगोपन ही खरी जबाबदारी या भावनेतून लावलेल्या सर्व 70 रोपांची नियमित निगा राखण्याचा संकल्प करण्यात आला. रोपांना वेळोवेळी पाणी देणे, त्यांचे संरक्षण करणे व त्यांची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे नियोजन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरला.