परदेशातील भावांपर्यंतही राखी पोहोचणार ; भुसावळ विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विशेष सुविधा
भावाच्या मनगटावर प्रेमाचे बंधन साजरे करण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज
भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे भाऊ-बहिणी एकमेकांपासून दूर असले तरी त्यांच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा कायम असतो. अशा परिस्थितीत बहिणीने प्रेमाने बांधलेली राखी भावाच्या मनगटापर्यंत सुरक्षितपणे पोहोचावी, यासाठी भारतीय डाक विभागाने विशेष तयारी केली आहे. भुसावळ डाक विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राखी पाठविण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बहिणीच्या हातून भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी ही केवळ धाग्याची नसून प्रेम, माया, आपुलकी आणि आशीर्वादाची भावना असते मात्र भाऊ दूरच्या शहरात किंवा परदेशात असल्यास प्रत्यक्ष भेटून राखी बांधणे शक्य होत नाही त्यामुळे पोस्टाच्या माध्यमातून राखी पाठविण्याची सुविधा अनेक कुटुंबांसाठी भावनिक नाते जपणारी ठरत आहे.





सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सुविधा
भुसावळ विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे. स्पीड पोस्टच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच परदेशातही राखी पाठविता येणार आहे. देशात 50 ग्रॅम वजनापर्यंतची राखी स्पीड पोस्टद्वारे केवळ 45 रुपयांत पाठविता येणार आहे. परदेशातील भावंडांसाठीही राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध असून, परदेशात राखी पाठविण्याचे शुल्क 235 रुपयांपासून आहे.
जगातील तब्बल 15 देशांमध्ये पोस्ट ऑफिसमार्फत राखी पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध आहे. परदेशात साधारणपणे 7 ते 12 दिवसांच्या कालावधीत राखी पोहोचविण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे परदेशात राहणार्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळावी, यासाठी नागरिकांनी वेळेपूर्वी राखी पोस्ट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राखी पाठविताना ती सुरक्षित राहावी, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये विशेष प्रकारचे प्लास्टिक कोटिंग असलेले खास राखी बंधन पाकीटही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पाकिटामुळे राखी सुरक्षितपणे पाठविता येते. त्यामुळे नागरिकांना राखीच्या सुरक्षिततेची चिंता करण्याची गरज राहणार नाही.
रक्षाबंधनाचा सण जवळ आला असून, बहिणीच्या मनात भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची ओढ असते. मात्र भाऊ हजारो किलोमीटर दूर परदेशात असल्याने प्रत्यक्ष भेट शक्य होत नाही. अशावेळी बहिणीने प्रेमाने बांधलेली राखी पोस्टाच्या माध्यमातून भावापर्यंत पोहोचल्याने अंतर कितीही असले तरी नात्यातील प्रेम कायम जवळ असल्याची सुंदर अनुभूती मिळते. याच भावनेतून पोस्ट ऑफिसने राखी पाठविण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पोस्ट विभाग हा केवळ पत्रे किंवा पार्सल पोहोचविणारी यंत्रणा नसून माणसा-माणसांमधील भावना आणि नाती जोडण्याचे कामही करतो. त्यामुळे बहिणींनी पोस्ट ऑफिसच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रक्षाबंधनानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेट देत असतो. त्यात मिठाई, विविध भेटवस्तू किंवा सर्वांत सोपे म्हणजे रोख रक्कम देण्याची पारंपरिक पद्धत आहे. मात्र डिजिटल युगात पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जीवन विमा किंवा पीपीएफचे खाते उघडून देऊन बहिणीला अनमोल भेट देता येऊ शकते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रेमासोबतच बहिणीच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षिततेची भेट देण्याचा पर्यायही नागरिकांसमोर उपलब्ध आहे.
50 ग्रॅमपर्यंतची राखी स्पीड पोस्टने 45 रुपयांत
देशातील कोणत्याही भागात 50 ग्रॅम वजनापर्यंतची राखी स्पीड पोस्टद्वारे केवळ 45 रुपयांत पाठविता येणार आहे. राखी सुरक्षित राहावी यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये विशेष प्लास्टिक कोटिंग असलेले राखी बंधन पाकीटही उपलब्ध आहे. त्यामुळे बहिणींनी वेळेत पोस्ट ऑफिसमध्ये राखी जमा करून भावाच्या मनगटापर्यंत प्रेमाचा धागा पोहोचवावा.
परदेशातील भावासाठीही राखीची सुविधा
परदेशात राहणार्या भावाला राखी पाठविण्यासाठीही डाक विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुमारे 15 देशांमध्ये राखी पाठविता येणार असून, साधारणपणे 7 ते 12 दिवसांत ती संबंधित देशात पोहोचविण्याची सुविधा आहे. परदेशासाठी राखी पाठविण्याचे शुल्क 235 रुपयांपासून आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधीच राखी पाठविण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे.