भुसावळात फुलला रानभाजीचा बाजार ; रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि कृषी विभाग, भुसावळ तालुका, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 16 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
28 विक्रेत्यांनी संकलीत केल्या रानभाज्या
जळगाव जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रांतून सुमारे 28 विक्रेते संकलित केलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच रानभाज्यांपासून तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी घेऊन आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत नागरिकांनी महोत्सवाला भेट देत विविध रानभाज्यांची खरेदी केली तसेच त्यांच्या चवीचा आस्वाद घेतला.
नैसर्गिक पद्धतीने उगवणार्या रानभाज्यांचे सेवन आरोग्यास उपयुक्त
महोत्सवाचे उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर अनेक रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने उगवत असतात. या रानभाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील विविध पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
रान व वनभाज्या उत्तम पर्याय
मांसाहार टाळण्यासाठी रानभाज्या आणि वनभाज्या हा चांगला पर्याय असून नागरिकांनी या पारंपरिक व नैसर्गिक अन्नपदार्थांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे आणि रानभाज्यांची खरेदी करावी, असे आवाहनही मंत्री सावकारे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी भुसावळ तालुका कृषी विभागाचे प्रमुख ऋषिकेश चौधरी, टेक्निकल डायरेक्टर प्रमोद जाधव, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे अध्यक्ष सुयश न्याती, सेक्रेटरी डॉ.राहुल पांडे, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या अध्यक्षा योगीगता वायकोळे, सेक्रेटरी कविता पाचपांडे यांच्यासह रोटरी व इनरव्हील क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण रानभाजी महोत्सवाचे नियोजन प्रकल्प प्रमुख सोनू मांडे आणि उपप्रमुख अविनाश वारके यांनी केले. विविध रानभाज्या, त्यांचे पदार्थ आणि स्थानिक विक्रेत्यांच्या सहभागामुळे महोत्सवाने भुसावळमध्ये पारंपरिक व नैसर्गिक खाद्यसंस्कृतीची चव पुन्हा अनुभवायला दिली.
