यावल शहरातील साने गुरूजी विद्यालयात चमत्कार सादरीकरणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर
यावल (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : यावल शहरातील पी. एम. श्री. साने गुरुजी विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यावल शाखेतर्फे कार्यक्रमा घेण्यात आला. या कार्यक्रमात चमत्कार सादरीकरणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर करण्यात आला व चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर करून त्यामागील वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली
यांची होती उपस्थिती
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यावल शाखेतर्फे पी.एम.श्री.साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील, देविदास फेगडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभागाचे कार्यवाह प्रा. दिगंबर कट्यारे यांनी विविध चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
प्रत्येक गोष्टीची चिकित्सा हवी
चमत्कारांच्या नावाखाली समाजात निर्माण होणार्या अंधश्रद्धांना बळी न पडता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोर्हाडे व यावल शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत महाजन यांनी सहकार्य केले.
