जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-20 स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन


जळगाव (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लूने जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ग्रीन संघाचा 64 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लू संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 171 धावा केल्या. संघाकडून क्रिषी नथानीने 21 चेंडूत 50 धावांची आक्रमक खेळी केली. त्याने 4 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. लोकेश पाटीलनेही 45 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जैन स्पोर्टस अकॅडमीचा ग्रीन संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 107 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ग्रीन संघाकडून जितेंद्र नाईकने 32 चेंडूत 39, तर पुर्वेश चौधरीने 22 चेंडूत 31 धावा केल्या. जैन स्पोर्टस अकॅडमी ब्लू संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत विजय मिळवून दिला. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार क्रिषी नथानी याला देण्यात आला.

13 जुलैपासून आजपर्यंत चालेल्या या स्पर्धेत एकूण 29 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान 28 सामने खेळविण्यात आले. या सामन्यांमध्ये 173 षटकार, 624 चौकार लगावत 6900 धावांची आतषबाजी पाहायला मिळाली. सोबतच 405 विकेट सुद्धा गोलंदाजांनी काढल्यात. अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरणाप्रसंगी जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट युसूफ मकरा, खजिनादार राजेंद्र लढ्ढा, सचिव अरविंद देशपांडे, जैन स्पोर्टस अकॅडमचे मुख्य कोच सुयस बुरकूल उपस्थीत होते. मोहम्मद फजल यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेतील उपविजेता ग्रीन, तर विजेता ब्लू संघासह स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंचाही यावेळी गौरव करण्यात आला. 5 मॅचमध्ये 190 धावा केल्याने अक्षय मेघानी बेस्ट बॅटमॅन म्हणून गौरवले. 5 मॅचमध्ये 9 विकेट घेणार्‍या मोहम्मद सैफ याला बेस्ट गोलदांज, तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून मोहम्मद नोमान याला सन्मानित करण्यात आले त्याने 148 धावांसह हॅट्रिक घेत 7 विकेट घेतल्यात. चषकासह कॅश पारितोषीकाने सर्वांना सन्मानित करण्यात आले.

पुर्वेश चौधरी या खेळाडूंने जेसीएल टी-20 सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती त्याला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी बॅट व क्रिकेट किट पुर्ण साहित्य देण्याचे जाहिर केले होते. ते साहित्य मान्यवरांच्या उपस्थित देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

संपूर्ण स्पर्धेत संदीप जरे, प्रविण इंगोले, संतोष बडगुजर, मुश्ताक अली, पंकज पुरोहीत, मोहम्मद साद, मोहम्मद फजल यांनी पंच आणि गुणलेखक म्हणून काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !