भुसावळात ‘जागतिक छायाचित्र दिन’ उत्साहात साजरा
भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : शहरातील श्रीरामनगर भागात भुसावळ शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी छायाचित्रकारांच्या वतीने आंतरराष्ट्रीय छायाचित्र दिन अत्यंत उत्साहात आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात तंत्रज्ञानाची जोड देत एका विशेष डिजिटल अॅपचे उद्घाटनही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात झाली. सर्वप्रथम कल्पना जावळे, दीपाली पाटील, आभा साळी, स्मिता राठोड आणि प्रिती नेवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छायाचित्रणाचा कणा असलेल्या आणि स्मृती जतन करणार्या कॅमेराचे सर्व उपस्थितांनी मनोभावे पूजन केले.
यांची होती उपस्थिती
ज्येष्ठ छायाचित्रकार नरसिंग राठोड, राजेंद्र जावळे, अविनाश साळी, श्याम गोविंदा, गणेश राठोड आणि मुकेश नेवे यांनी कॅमेरा पूजन केले.
फोटोग्राफी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानावर आणि जुन्या आठवणींवर या वेळी ज्येष्ठ दिग्गजांनी प्रकाश टाकला.
लक्ष अॅपचे शानदार उद्घाटन
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे युवा तंत्रज्ञ मीत अविनाश साळी याने फोटोग्राफी व इतर क्षेत्रासाठी विकसीत केलेल्या विशेष लक्ष अॅपचे सादरीकरण. या डिजिटल अॅपचे अधिकृत उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र जावळे आणि श्याम गोविंदा यांच्याहस्ते रिबीन कापून करण्यात आले. छायाचित्रकारांना व सर्व इतर व्यावसायिकांना आधुनिक युगात या अॅपचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सूत्रसंचालन अविनाश साळी तर आभार गणेश राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि फोटोग्राफी क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

