नशिराबादमध्ये पोलीस कर्मचार्याच्या घरावर दरोडा : पिस्तूलही रोखले
कर्मचार्याने 112 वर कॉल केल्याने मोठा अनर्थ टळला : पाठलागाअंती वाहन जप्त
नशिराबाद (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : नशिराबाद गावातील रहिवासी व डोंबिवलीतील विष्णूनगर ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचार्याच्या घरात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. कर्मचार्यावर पिस्तूल रोखत तसेच महिलेला सुरीचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला मात्र कर्मचार्याने वेळीच 112 वर कॉल केल्यानंतर आलेल्या पोलिसांमुळे दरोडेखोरांनी पळ काढला. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी जाताना पोलीस कर्मचार्याची कार पळवली मात्र नंतर पाठलाग करून कार ताब्यात घेण्यात आले तर अंधारात दरोडेखोर पसार झाले.
काय घडले नशिराबाद गावात ?
नशिराबाद गावातील भादली रोडवरील मुक्तेश्वरनगर परिसरात पोलिस नाईक गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. कोळी हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलिसात कार्यरत आहेत. नातेवाइकाचे निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी ते नशिराबाद येथे आले होते. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी अचानक त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात शिरताच एका दरोडेखोराने गणेश कोळी यांच्या पत्नी सुनीता यांच्या गळ्याला सुरा लावला तर दुसर्याने रिव्हॉल्वर ताणून धरत घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड देण्याची मागणी केली. दरोडेखोरांनी कुटुंबीयांना धमकावण्यास सुरुवात केली.
कर्मचार्याची सतर्कता : 112 वर कॉल
घटनेच्या वेळी गणेश कोळी यांच्या अंगावर सोन्याचे दागिने व हातात अंगठ्या होत्या. दरोडेखोरांचे लक्ष जाताच त्यांनी तत्काळ स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. संतापलेल्या दरोडेखोरांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला. परिस्थिती अत्यंत बिकट आणि हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच कोळी यांनी बाथरूममधूनच अत्यंत शांत डोक्याने डायल 112 या पोलिस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
सतर्क पोलिसांमुळे लूट टळली
पोलिसांना माहिती मिळाल्याने घटनास्थळी मदत पोहोचण्याची चाहूल दरोडेखोरांना लागली. पोलिसांचा सुगावा लागताच दोघे दरोडेखोर घाईघाईने तेथून पसार झाले. दरोडेखोरांनी घरातील टेबलवर पडलेली गणेश कोळी यांच्या कारची (एम.एच.05 क्यू.7121) चावी उचलली आणि ते कार घेऊन थेट भादली रोडने सुसाट पळाले. पोलिस मागावर असल्याचे समजताच दरोडेखोरांनी मन्यारखेडा शिवारातील अंधारात कार सोडून दिली आणि शेतातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिस कर्मचार्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांच्या तावडीतून कुटुंबीय बचावले.


