गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसांसह दोघे आरोपी जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांची संयुक्त कारवाई
जळगाव : चोपडा बसस्थानकावर दोन संशयीत शस्त्रासह येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांची संयुक्त कारवाईत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तुषार पिताजी चव्हाण (23, रा.भोसे, ता.कर्जत, जि.अहमदनगर, हल्ली मुक्काम भेकराई , फुरसुंगी, हडपसर पुणे व संतोष अशोक माळी (21, रा. बालाजी नगर, हडपसर, पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सापळा रचून केली अटक
बलवाडी-चोपडा बसमध्ये दोन संशयीत हत्यार बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून चोपडा बसस्थानकावर सापळा रचण्यात आला. बस आलयाने दोघे संशयीत उतरताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीतांच्या बॅग झडतीत कट्टा तसेच पाच जिवंत काडतुसे आढळली. आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक. भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही.पी.लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र सोनवणे, सुनील पाटील, ज्ञानेश्वर जवागे, प्रदीप राजपूत, प्रकाश मथुरे, योगेश शिंदे, प्रमोद पवार, शुभम पाटील, शेषराव तोरे, निलेश लोहार, योगेश पालवे आदींच्या संयुक्त पथकाने केली.