कन्नड घाट उतरताना सुरत बसचे स्टेअरींग जाम : अनियंत्रीत बस डिव्हायडरला धडकली ; चौघे जखमी
सुदैवाने टळला मोठा अपघात : प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारून वाचवले प्राण
चाळीसगाव (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे निघालेली एस.टी.बस कन्नड घाटात उतरत असतानाच अचानक स्टेअरींग रॉड तुटला वा जाम झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस घाटाच्या कडेला असलेल्या डिव्हायडरवर आदळली. प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने मोठा अपघात टळला तर या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले.
बस अनियंत्रीत होताच प्रवाशांचा थरकाप
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगराकडून सुरतकडे रविवारी सकाळी बस (एम.एच.40 एन.9726) निघाल्यानंतर कन्नड घाटात बस आल्यानंतर अचानक स्टेअरींग रॉड तुटला वा जाम झाल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले व बस घाटाच्या कठड्याजवळील डिव्हायरडरला जावून धडकली. अचानक झालेल्या या प्रकारानंतर बसमधील प्रवाशांच्या गोटात थरकाप उडाला.



बस कठड्याला धडकल्यानंतर मोठा आवाज होताच प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्या. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षितपणे बसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जीवात जी आला. या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बसचे स्टिअरिंग रॉड तुटले की स्टिअरिंग जाम झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप एस.टी.प्रशासनाकडून समोर आलेली नाही तर अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने बस कठड्याला धडकून अडकून राहिली अन्यथा मोठा अनर्थ होण्याची भीती होती.
