जळगाव जिल्ह्यात ईद शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे 27 सूत्री नियोजन

पाच हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया : रूट मार्च, सोशल मीडिया पेट्रोलिंग, बीडीडीएस-डॉग स्क्वाड, स्ट्रायकिंग फोर्ससह 27 सूत्री नियोजन ; मागील चार वर्षांतील घटनांचा अभ्यास करून बंदोबस्त


जळगाव (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी व्यापक आणि बहुआयामी नियोजन केले होते. गाव पातळीवरील बैठका, मुस्लिम धर्मीय प्रतिनिधींशी संवाद, पाच हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया, सोशल मीडिया पेट्रोलिंग, रूट मार्च, बीडीडीएस व डॉग स्क्वाडची तपासणी, स्ट्रायकिंग फोर्सची नियुक्ती, वाहतूक नियोजन आणि डायल 112 ची सतर्कता अशा विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला.

गावोगावी बैठक : सर्व स्तरांवर समन्वय
ईदपूर्वी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पोलीस पाटील आणि नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या. मुस्लिम समाजातील प्रतिनिधींशी पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्हास्तरावर संवाद व बैठका घेऊन शांतता आणि सहकार्याचे आवाहन करण्यात आले.



मागील गुन्ह्यांचा आढावा घेऊन संबंधित प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासह संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पाच हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर विशेष नजर
सोशल मीडिया सेलमार्फत सोशल मीडिया पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट, अफवा किंवा धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित होऊ नये यासाठी सायबर यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. कोणत्याही व्यक्ती, संघटना अथवा गोरक्षकांकडून संशयास्पद बाबीची माहिती मिळाल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची खात्री करून आवश्यक ती कारवाई करीत होते.

एसआरपीएफपासून होमगार्डपर्यंत प्रभावी बंदोबस्त
बंदोबस्तासाठी एसआरपीएफ कंपनी, होमगार्ड, आरसीपी आणि स्थानिक पोलीस दलाचा प्रभावी वापर करण्यात आला. डीएसबी, एलसीबी, कंट्रोल रूम, वेल्फेअर, सायबर आणि रीडर शाखांसह विविध नॉन-एक्झिक्युटिव्ह शाखांतील कर्मचार्‍यांनाही बंदोबस्तात स्ट्रायकिंग फोर्स म्हणून तैनात करण्यात आले.

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचार्‍यांच्या रजाही आगाऊ बंद करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी रूट मार्च काढून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. जळगाव शहरातील रूट मार्चमध्ये जिल्हाधिकारीदेखील सहभागी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पहाटे चार वाजताही धार्मिक स्थळांची तपासणी
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ‘गुड मॉर्निंग स्क्वॉड’ कार्यरत ठेवण्यात आला होता. हे पथक पहाटे सुमारे चार वाजल्यापासून विविध धार्मिक स्थळे आणि महत्त्वाच्या पुतळ्यांची तपासणी करीत होते. धार्मिक स्थळे व पुतळ्यांची वेळोवेळी बीडीडीएस आणि डॉग स्क्वाडमार्फत तपासणी करण्यात आली. महत्त्वाच्या मिरवणूक मार्गांवरही आवश्यक तपासणी आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या.

दंगा नियंत्रणापासून सुरक्षा साहित्यापर्यंत तयारी
गॅस गन, हेल्मेट, शिल्ड, लाठ्या आणि इतर आवश्यक सुरक्षासाहित्याचा आढावा घेऊन ते विविध शासकीय वाहनांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध ठिकाणी दंगा नियंत्रणाची पूर्वतयारी आणि सराव करण्यात आला. एमटीओ विभागामार्फत आवश्यक वाहने आगाऊ विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली होती.

डीजे चालकांना सूचना ; बॅनर आणि फलकांवर लक्ष
डीजेसंदर्भात संबंधितांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना व नोटिसा देण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान कोणतेही अनधिकृत, आक्षेपार्ह किंवा इतर धर्मीयांच्या भावना दुखावणारे बॅनर, पोस्टर किंवा फलक लावले जाणार नाहीत, याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली.

परिस्थितीनुसार अवाजवी किंवा नियमबाह्य बॅनर्स काढून घेण्याची कारवाईही करण्यात आली. तसेच मिरवणुकीदरम्यान काही विशिष्ट वादग्रस्त प्रतीकांचा वापर होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले.

मिरवणूक मार्ग आणि वाहतूक व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन
ईद मिरवणुकीच्या मार्गांवर गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला. आवश्यकतेनुसार वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले.

वाहतूक शाखेने आधीच बॅरिकेडिंग करून आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता. शिस्तबद्ध वाहतुकीसाठी ईदपूर्वी चार दिवस विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली असून, या कारवाईतून सुमारे 52 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.

डायल 112 आणि कंट्रोल रूम सतर्क
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी डायल 112 यंत्रणा विशेष सतर्क ठेवण्यात आली होती. प्रतिसादाचा कालावधी कमी ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले.

कंट्रोल रूमचा कर्मचारीवर्ग सातत्याने अलर्ट राहून वायरलेस यंत्रणेद्वारे विविध भागांतील माहिती घेत होता आणि त्यानुसार आवश्यक सूचना देत होता.

महावितरण, पीडब्ल्यूडी, वैद्यकीय आणि महापालिकेशी समन्वय
ईदपूर्वीच महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैद्यकीय विभाग आणि महानगरपालिका यांच्याशी पत्रव्यवहार करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणूक मार्ग, वीजपुरवठा, रस्ते, आरोग्यविषयक सुविधा आणि इतर नागरी व्यवस्थांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विविध विभागांशी समन्वय साधण्यात आला.

मागील चार वर्षांतील ईद मिरवणुकीसंदर्भातील गुन्हे
जिल्हा पोलिसांनी मागील चार वर्षांतील ईद सणाच्या मिरवणुकीसंदर्भातील घटनांचाही आढावा घेतला होता. उपलब्ध माहितीनुसार संबंधित गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

पडद्यामागील पोलिसी नियोजनामुळेच शांततेचे वातावरण
मोठे धार्मिक सण, मिरवणुका किंवा संवेदनशील प्रसंग शांततेत पार पडणे हे केवळ बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांमुळे होत नाही त्यामागे अनेक दिवसांचे नियोजन, माहिती संकलन, बैठका, प्रतिबंधात्मक कारवाया, सोशल मीडिया मॉनिटरिंग, विविध शासकीय विभागांशी समन्वय, सुरक्षा तपासणी आणि तातडीच्या प्रतिसादासाठी सज्ज असलेली यंत्रणा कार्यरत असते. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी केलेल्या या व्यापक उपाययोजनांमुळे जिल्ह्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !