धक्कादायक हत्याकांड : प्रेयसीने जुन्या प्रियकरासोबत केली पत्नीची हत्या
प्रेमसंबंध, मत्सरातून महिलेचा जीव घेतल्याचा पोलिसांचा दावा
भोपाळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये प्रेमसंबंध आणि मत्सरातून एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राखी रैकवार या महिलेचा मृतदेह 27 ऑगस्ट रोजी रातीबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगाव येथील एका पडक्या घरात आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी राखीचा पती मोनू रैकवार याची प्रेयसी शशी रैकवार आणि तिचा कथित जुना प्रियकर नरेंद्र या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी मोनू रैकवार याने पत्नी राखी बेपत्ता असल्याची तक्रार रातीबड पोलिसांकडे दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. नातेवाईकांची चौकशी तसेच परिसरात शोध घेऊनही चार दिवस राखीचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर 27 ऑगस्ट रोजी गोरेगावमधील एका पडक्या घरात तिचा मृतदेह आढळून आला.

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांचा संशय मोनूची प्रेयसी शशी रैकवार हिच्यावर गेला.
पतीसोबत राहणार्या राखीचा शशीला होता कथित राग
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शशीला राखीचे मोनूसोबत राहणे पसंत नव्हते. या कारणातून तिच्या मनात राखीबद्दल राग निर्माण झाला. त्यानंतर राखीला मार्गातून दूर करण्याचा कथित कट रचण्यात आला. या कटात शशीने तिच्या जुन्या प्रियकराला नरेंद्रला सहभागी करून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
23 ऑगस्टला घरातच घडला प्रकार
पोलिसांच्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी मोनू कामावर गेल्यानंतर घरात राखी आणि शशी होत्या. त्याच काळात शशीने नरेंद्रला कथितरीत्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी राखीची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
हत्येनंतर मृतदेह चादरीने झाकून घराशेजारील पडक्या घरात नेऊन ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर नरेंद्र तेथून निघून इटारसीला गेल्याची माहिती तपासात मिळाली.
चार दिवसांनंतर पडक्या घरात मृतदेह
राखी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने 23 ऑगस्टलाच केली होती. मात्र, तिचा मृतदेह त्याच परिसरातील पडक्या घरात असल्याची माहिती कुटुंबीयांना किंवा पोलिसांना नव्हती. 27 ऑगस्ट रोजी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान शशीची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार, चौकशीत शशीने नरेंद्रच्या मदतीने राखीची हत्या केल्याची कबुली दिली. राखीचे मोनूसोबत राहणे आपल्याला पसंत नव्हते, असे तिने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.
एक आरोपी भोपाळमध्ये, दुसरा इटारसीत
पोलिसांनी शशीला तिच्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान, नरेंद्र इटारसीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला तेथून अटक केली. दोन्ही आरोपींना भोपाळ जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
एसीपी अंकिता खातरकर यांनी सांगितले की, 27 ऑगस्ट रोजी गोरेगाव येथे एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार तिच्या पतीने 23 ऑगस्ट रोजी केली होती. तपासादरम्यान पतीच्या प्रेयसीची चौकशी केली असता तिने आपल्या मित्रासोबत हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
