जळगावात शरद पवारांच्या स्वागतासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र ; एकजुटीच्या चर्चांना उधाण !
जळगाव (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कोथळीत आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आल्याने दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले.
जळगावात जल्लोषात स्वागत
शरद पवार जळगाव विमानतळावर पोहोचताच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार हे एकाचवेळी स्वागतासाठी उपस्थित होते. अजित पवार गटाच्या वतीने शरद पवार यांना पगडी परिधान करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचे सूचक वक्तव्य
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जे काही चांगले घडते, त्याची सुरुवात जळगावातून होते, असे सूचक वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील संभाव्य जवळिकीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. दरम्यान, शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांनीही दोन्ही गटांची मूळ विचारधारा एकच असल्याचे सांगितले. त्यामुळे खडसेंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावात दोन्ही गटांमधील राजकीय दुरावा काही प्रमाणात कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सुप्रिया सुळेंची भूमिका चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी एकत्रच आहे, आमचा पक्ष एकत्रच आहे, असे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा आणि पक्षावरील न्यायालयीन लढाईचा संदर्भ दिला. सुप्रिया सुळे यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली असून पक्षाचे संविधान आणि पक्षावरील अधिकाराचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पक्षाचा अधिकार शरद पवार यांना न्यायाने मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पक्षाबाबत पुढील निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवार यांचाच असेल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
