भुसावळातील राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरा : 11 नगसेवकांचा ‘शिंदे सेनेत’ प्रवेश
माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंनी सोडली राष्ट्रवादी : भुसावळात आता नव्या राजकीय समीकरणांची नांदी
गणेश वाघ
भुसावळ (गुरुवार, 3 ऑगस्ट 2026) : भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहारचे जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बुधवार, 2 सप्टेंबर रोजी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर दुसर्याच दिवशी अर्थात गुरुवारी रात्री 10 वाजता भुसावळातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे निवडून आलेल्या 11 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. एकाच वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी धक्कातंत्राचा वापर करीत शिंदे सेनेत केलेल्या प्रवेशाने भुसावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी नगराध्यक्षांचाही शिवसेनेत प्रवेश
माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भुसावळातील माजी आमदार संतोष चौधरींच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले गटनेता सचिन संतोष चौधरींसह 11 नगरसेवकांनी गुरुवारी रात्री मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

चौधरींच्या नेतृत्वात निवडून आलेले राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक ‘शिवसेनेत’
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या 12 पैकी 11 नगरसेवकांनी गुरुवारी रात्री शिंदे सेनेत प्रवेश केला. प्रवेश करणार्यांमध्ये गटनेता व नगरसेवक सचिन संतोष चौधरी (प्रभाग 19 ब), शेख दिलनबाज इक्बाल (प्रभाग क्र. 12 अ), उल्हास भीमराव पगारे (प्रभाग 2 अ), सुभद्रा गणपत गुंजाळ (प्रभाग 14 ब), अमीन निसार कुरेशी (15 अ), शेख नसीब बी. शेख नदीम (प्रभाग 15 ब), सचिन भास्कर पटेल (16 अ), अकिल नादर पिंजारी (प्रभाग 17 अ), शबाना बी.सिकंदर खान (प्रभाग 17 ब), पुष्पा कैलास चौधरी (प्रभाग 19 अ), सुनीता कृष्णा कर (प्रभाग 13 ब) यांचा समावेश आहे.
शहरात आता सर्वत्र विकासकामे होणार : सचिन चौधरी
राष्ट्रवादीतर्फे निवडून आलो असलोतरी आमच्या प्रभागात विकासकामे होत नव्हती व राष्ट्रवादीत न्याय मिळाला नाही. अनेक वर्षांपासून शहरातील अल्पसंख्यांक भागात कामे झाली नाहीत मात्र आता शहरात जोरदार विकासकामे होतील, पालिकेतील बोगस कामांची निश्चितपणे चौकशी होईल, असे सचिन चौधरी म्हणाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही सारे काम करू, असेही ते म्हणाले.
प्रवेशानंतर बदलतील समीकरणे !
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनिल चौधरी हे त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपद मिळाले होते मात्र बच्चू कडू हे शिंदेसोबत गेल्याने त्यांचे खंदे समर्थक चौधरी यांनी मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ बंगल्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करीत चर्चांना पूर्णविराम दिला. त्यातच भुसावळच्या अपात्र नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनीदेखील शिंदे सेनेत प्रवेश केला. अलीकडेच भंगाळे यांनी अपात्रतेविरोधात दाद मागितली असून लवकरच न्यायालयाचा निर्णय समोर येार आहे. अशातच भंगाळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेची ताकद वाढवण्यासोबतच चौधरी जिल्ह्यात आपले वलय निर्माण करतील, असे जाणकारांना वाटते.

