अंजाळेच्या नूतन विद्या मंदिरात गणपती मूर्ती कार्यशाळा व दहीहंडी उत्साहात
यावल (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील अंजाळे गावातील नूतन विद्या मंदिर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, पर्यावरण संवर्धन तसेच पारंपरिक सणांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. हरितसेना शिक्षक लिलाधर वानखेडे यांच्यासह जितेंद्र धांडे व सुनील सोनवणे यांच्या सहकार्याने गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार केल्या. पर्यावरणाचे संरक्षण आणि पारंपरिक संस्कृतीची जपणूक यांचा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. यानंतर शाळेच्या परिसरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये या उत्सवाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी श्रीमती ज्योती परखड, मनोज चौधरी, पराग चौधरी, यश चौधरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा व पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडून आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

