भुसावळातील कट्टर विरोधक महायुतीत ; सूर जुळणार का ?

आगामी काळात राजकीय आखाडा गाजणार ! शिंदे सेनेच्या आगामी भूमिकेकडे लागले लक्ष


गणेश वाघ
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : भुसावळातील कट्टर राजकीय विरोधक असलेले प्रहारचे अनिल चौधरी तसेच माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंसह राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. राज्यात महायुती एकत्रपणे काम करीत असलीतरी चौधरी बंधूंसह भुसावळचे आमदार व मंत्री संजय सावकारे यांच्यातील सुप्त संघर्ष जिल्ह्याला ठावूक आहे. अशात महायुतीच्या छताखाली एकत्र आलेल्या या पदाधिकार्‍यांचे आगामी काळात एकमेकांशी सूर जुळणार का? नेतृत्व नेमके कुणाचे राहणार? चौधरींच्या मनात नेमके काय? यासह अनेक प्रश्न भुसावळकरांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार नसलीतरी आगामी काळातील राजकारणातून अनेक प्रश्नांची उकल होईल, यात शंकाच नाही.

भुसावळात राजकारण ढवळले
भुसावळातील राष्ट्रवादीच्या तब्बल 11 नगरसेवकांनी एकाचवेळी शिंदे सेनेत प्रवेश केला तर प्रहारच्या अनिल चौधरींसह स्थानिक माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांनीही हाती धनुष्यबाण घेतल्याने शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना या निमित्त पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील सत्तेत महायुती एकत्र असलीतरी स्थानिक स्तरावर आता आता शिंदे सेनेत आलेल्या नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांचे स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांशी विचारांचा तालमेल जमेल का? हा खरा प्रश्न आहे. भुसावळ नगराध्यक्ष अपात्रतेचा निकाल उंबरठ्यावर असताना झालेल्या शिंदे सेनेतील प्रवेश सोहळ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अल्पसंख्यांक भागाचा विकास न झाल्याने वा पक्षात न्याय न मिळाल्याने प्रवेशाची कारणे देण्यात येत असलीतरी प्रत्यक्षात शिंदे सेनेत जाण्यामागे चौधरींना या माध्यमातून सत्तेत येण्याचा मार्ग सोपा झाल्याचे जाणकारांना वाटते.


संतोष चौधरींच्या अनोख्या ‘पॅटर्न’ची चर्चा
माजी आमदार संतोष चौधरींनी राष्ट्रवादी न सोडता अखेरपर्यंत शरद पवारांची साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला असलातरी यामागे त्यांना आगामी निवडणुकीत अल्पसंख्यांक मतदारांची व्होट बँक आपल्या हाती कायम ठेवायची आहे, हेदेखील तितकेच स्पष्ट आहे. राजकारणापासून अलिप्त निखील संतोष चौधरी यांचा शिंदे सेनेत प्रवेश घडवून त्यांचा राजकारणात चंचू प्रवेश करण्यात आला तर जयेश चौधरी मात्र चौधरींसोबत असल्याने या अनोख्या पॅटर्नचीही चर्चा आहे.

नगरसेवकांच्या प्रवेशाने शिंदे सेनेची वाढली ताकद
भुसावळातील राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांचा एकत्रीत प्रवेश हा शिंदेसेनेसाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यात विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक पक्षात आले आहेत शिवाय अनिल चौधरी, गायत्री भंगाळे यांची पूर्वीची नगरपालिका निवडणुकीतील कामगिरी व स्थानिक नेटवर्क अशी त्रिसूत्री तयार झाल्याने आगामी काळात जिल्हा परिषद असो की पंचायत समिती या निवडणुकीत चौधरी आपला जोर लावून भाजपाला आव्हान देतील हे तितकेच स्पष्ट आहे. याचा अर्थ असा की, शिंदेसेना भुसावळमध्ये आता केवळ विधानसभा निवडणुकीपुरती राजकीय शक्ती न राहता नगरपालिका आणि शहराच्या संघटनात्मक राजकारणात स्वतंत्र ताकद निर्माण करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, असे असलेतरी राष्ट्रवादीने 12 नगरसेवकांसह दोन अपक्ष नगरसेवकांनी गट नोंदणी केल्याने खरं तर संपूर्ण गट शिंदे सेनेत जाणे अपेक्षित होते मात्र तूर्त 11 नगरसेवकांनीच प्रवेश केल्याने आगामी काळात राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकासह दोन अपक्षांची भूमिकेवरही गणिते अवलंबून आहेत.

अनिल चौधरींची हेलिकॉप्टर इंन्ट्री पण…..!
गेल्या काही दिवसांपासून अनिल चौधरींसह भुसावळातील राष्ट्रवादी नगरसेवक शिंदे सेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत मात्र पाळधीतून ‘ग्रीन सिग्नल’ मिळत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा होती मात्र ही चर्चा अफवा असल्याचे ठरवत चौधरींनी ‘ग्रीन सिग्नल’ मिळवत मुंबईतच प्रवेश सोहळा केला. प्रवेशानंतर आता खरी अडचण स्थानिक भाजपेयी पदाधिकार्‍यांशी जुळवून घेण्याची आहे. तसे पाहिले तर पालिकेत संख्याबळाच्या दृष्टीने भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे सेनेतील नगरसेवक आता पालिकेच्या राजकारणात काय भूमिका घेतात ? याकडे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. मंत्री सावकारे-चौधरी यांच्यातील सुप्त संघर्ष पाहता शिंदे सेना व भाजपाचे सूर कितपत जुळतात ? हे आजच सांगणे कठीण आहे. अनिल चौधरींनी हेलिकॉप्टरवरून अर्थात मुंबईहून इंन्ट्री केली असलीतरी ग्राउंड लेव्हलला जुळवून घेताना त्यांना अनंत अडचणी असतील हे स्पष्ट आहे. चौधरींच्या आगामी भूमिकेवरही अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.

माजी आमदारांचा सावध पवित्रा, अखेरपर्यंत सुप्रीमोंसोबत !
धाकट्या बंधूने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मोठे बंधू व माजी आमदार संतोष चौधरींनी सावध पवित्रा घेतला आहे. अखेरपर्यंत आपण राष्ट्रवादीत अर्थात शरद पवारांसोबत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. अर्थात या सावध भूमिकेमागे आगामी निवडणुका व अल्पसंख्यांक मतदारांची व्होटबँक आपल्याच ताब्यात रहावी हा उद्देश तितकाच स्पष्ट आहे. शरद पवारांवर चौधरींनी प्रेम दर्शवले असलेतरी नजीकच्या मुक्ताईनगरात आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवाला सुप्रीमो शरद पवार आल्यानंतरही माजी आमदार संतोष चौधरी तेथे गेले नाहीत व या कार्यक्रमाला त्यांनी पाठ फिरवली. न जाण्यामागे पूर्व नियोजित दौर्‍याचे निमित्त आहे मात्र यातून खडसे-चौधरींमधील सुप्त संघर्षही समोर आला आहे. चौधरींनी खडसेंसोबत राखलेले अंतर व घेतलेल्या सावध भूमिकेचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !