गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी बोदवड पोलिसांचे कोम्बिंग : रेकॉर्डवरील 60 आरोपींची तपासणी
तिघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई : 42 संशयित मोटारसायकली ताब्यात
बोदवड (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवण्याबरोबरच अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी बोदवड पोलिसांनी शनिवार, 4 सप्टेंबर 2026 रोजी व्यापक प्रमाणावर कोम्बिंग राबवले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी विविध आघाड्यांवर तपासणी केली. रेकॉर्डवरील 60 आरोपींची तपासणी केल्यानंतर तिघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तर 42 संशयित मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. अचानक झालेल्या कारवाईनंतर गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
दोन अधिकार्यांसह 130 कर्मचार्यांचा सहभाग
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, आठ पोलीस अधिकारी, 130 पोलीस अंमलदार तसेच आरसीपी पथक सहभागी झाले होते. मोठ्या पोलीस बंदोबस्तासह करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान रेकॉर्डवरील आरोपी, अवैध दारू विक्री तसेच संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.

60 रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान बोदवड पोलिसांनी एकूण 60 रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. यापैकी तीन आरोपी आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
अवैध दारू विक्रीवर कारवाई
कोम्बिंगदरम्यान अवैध दारूविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 10 हजार 780 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 55 लिटर गावठी दारू तसेच 66 नग देशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली.
42 संशयित मोटारसायकलींची तपासणी
पोलिसांनी 42 संशयित मोटारसायकली जप्त केल्या असून या वाहनांची कागदपत्रे तसेच मालकी हक्काबाबत तपासणी केली जात आहे शिवाय याशिवाय आरटीओ विभागामार्फतही संबंधित वाहनांची तपासणी करून अनियमितता आढळल्यास वाहनधारकांविरुद्ध नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, प्रभारी उपअधीक्षक सुहास बिर्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह आठ पोलीस अधिकारी, 130 पोलीस अंमलदार तसेच आरसीपी पथकांनी केली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
बोदवड पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध दारूविक्री, अंमली पदार्थांची विक्री, जुगार तसेच कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे तसेच माहिती देणार्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आवाहनात नमूद केले आहे.

