आजचा विद्यार्थीच उद्याचा प्रेरणादायी शिक्षक ! : भालोद विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात


भालोद (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा, त्यांच्या विचारांना दिशा देणारा आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणारा मार्गदर्शक असतो. शिक्षक दिनानिमित्त कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षकाची भूमिका साकारून अध्यापन केले. आजचा विद्यार्थी उद्याचा प्रेरणादायी शिक्षक या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व अनुभवसमृद्ध ठरला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे हे होते. विद्यार्थिनी चेतना नितीन कोळी हिने प्रस्तावना केली. विद्यार्थिनी पिंकी पावरा (टी.वाय.बी.ए.), वैशाली उदेभान जाधव (एस.वाय.बी.ए.), तसेच अतिकेश दत्तात्रय माळी(बहिणाबाई अभ्यासिका), मुकेश दिलीप भालेराव(बहिणाबाई अभ्यासिका), अक्षय अजय कोळी(बहिणाबाई अभ्यासिका), पूजा ज्ञानेश्वर मोरे (टी.वाय.बी.ए.) कोमल धनराज तायडे (एस वाय बीएससी)आदी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध विषयांवर अध्यापन करून आपल्या अध्यापन कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.


वक्तृत्व गुण विकसीत करणे गरजेचे
प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञान आत्मसात न करता आत्मविश्वास, नेतृत्वगुण, वक्तृत्व आणि अध्यापन कौशल्य विकसीत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन हेमांगी हेमंत इंगळे (एस.वाय.बीएससी) यांनी तर नयना मधुकर मोरे (एस.वाय.बी.ए.) यांनी आभार मानले. हा विशेष उपक्रम राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा डॉ.सुनील नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

नेतृत्व गुणांना व्यासपीठ मिळावे
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षकाची भूमिका साकारावी, शिक्षकांच्या कार्याची जाणीव व्हावी आणि त्यांच्या अंगी असलेल्या अध्यापन व नेतृत्वगुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी सांगितले. डॉ.राकेश चौधरी, डॉ.गणेश चौधरी, डॉ.मीनाक्षी वाघुळदे, डॉ.वसंतराव पवार, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.भावना प्रजापती, प्रा.कोमल सावळे, प्रा.जान्हवी परतणे, प्रा.हंशाली महाजन, प्रा.मानसी महाजन, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !