जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या प्रयत्नांना यश : वरणगाव भूमिगत गटार प्रकल्पाला मंजुरी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळेंची माहिती
वरणगाव (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : वरणगाव शहरात भुयारी गटार प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नांनी शहरासाठी भूमिगत गटार प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.
82 कोटींचा प्रस्ताव
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गेल्या सात महिन्यापासून मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे भूमिगत गटार प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी 82 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्र्यांची वेळोवेळी त्यासाठी भेट घेण्यात आली. राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून कक्ष अधिकारी केशव जाधव यांनी 3 सप्टेंबर 2026 रोजी या प्रकल्पासंदर्भात आदेश काढले आहेत. जागतिक बँक सहित महाराष्ट्र नागरिक पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पाच्या अंमलबजावणीस करण्यास संदर्भानुसार शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. वरणगाव शहरासाठी राज्य सरकारने भूमिगत गटार योजना मंजूर केल्याने वरणगावकरांचा आता सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

मंत्र्यांचे मानले आभार
वरणगावकरांना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी भेट दिली असून त्यांच्यासह मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानतो, असे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगतले. सुधारित प्रकल्पाला तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे सदर ोजनेची तांत्रिक प्रशासकीय मान्यता लवकरच घेऊन आम्ही काम पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही काळे यांनी सांगितले. राज्यात 18 नगरपरिषदांना भुयारी गटार योजना मंजूर असून त्यात वरणगाव पालिकेचाही समावेश आहे.

