भुसावळात गोगानवमीचा अभूतपूर्व जल्लोष
शहरातून निघाल्या 13 भव्य मिरवणुका : रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा जल्लोष
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : भुसावळ शहरात शनिवारी भगवान श्री जाहरवीर गोगादेवजी यांच्या गोगानवमी उत्सवानिमित्त विविध भागांतून तब्बल 13 भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. अतिशय शिस्तबद्ध व भव्य मिरवणुकांना शहरवासीयांचे लक्ष वेधले. सायंकाळी पाच वाजेनंतर सुरू झालेल्या मिरवणुकांचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत कायम होता.
दुचाकी रॅलीने उत्सवाची सुरूवात
उत्सवाची सुरुवात शनिवारी सकाळी उत्सव समितीच्या वतीने आयोजित दुचाकी रॅलीने झाली. पु.ओं.नाहाटा चौकापासून सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही रॅली जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज, दगडी पूल, सरदार वल्लभभाई पुतळा, जळगाव रोड, महात्मा गांधी पुतळा, शहर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्गे पुढे जात वाल्मीक चौकात दाखल झाल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

सायंकाळी मिरवणुकांनी वेधले लक्ष
सायंकाळी वाल्मीक नगरासमोरील चौकातून पवित्र छडी मिरवणुकीस प्रारंभ झाला. पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस ठाणे, जामनेर रोड, मोटूमल शोभराज चौक, ब्राह्मण संघ, अण्णाभाऊ साठे स्मारकमार्गे मार्गक्रमण करत मिरवणूक वाल्मीक चौकात दाखल झाली. त्यानंतर नेहरू मैदानावर मिरवणुकीचा भव्य समारोप झाला. येथे आयोजित महाआरतीत हजारो भाविक सहभागी झाले. दरम्यान, उत्सवानिमित्त बसस्थानकाचे दिवसभर आगारात तात्पुरता स्थलांतर करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
मेहतर वाल्मीक समाजाचे अध्यक्ष मिथून बारसे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी समिती अध्यक्ष नितीन करोसीया, उपाध्यक्ष करण लख्खन यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. भगवान श्री जाहरवीर गोगा देवजी हे समाजाचे श्रद्धास्थान असल्याने शहरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या श्रद्धेने उत्सवात सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, आकर्षक सजावट आणि छडी मिरवणुकीतील शिस्तबद्धता यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. विभागीय पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांनी नियोजनबद्ध व्यवस्था केली. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी मिरवणुकीदरम्यान शहरात भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी करीत परिस्थितीचा आढावा घेतला.

