गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र
जळगाव (रविवार, 13 सप्टेंबर 2026) : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निकच्या बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागातर्फे प्राध्यापकांच्या मानसिक आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ या विशेष वेलनेस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रसिद्ध ‘माइंडफुल एज्युकेटर’ व बाल मानसशास्त्रज्ञ सौ. मानसी गगधनी यांनी या कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. त्यांनी आत्मजागरूकता, मानसिक आरोग्य, विचारांचे व्यवस्थापन तसेच दैनंदिन जीवनातील तणावावर प्रभावीपणे मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान सहभागी प्राध्यापकांसाठी ध्यानधारणा (मेडिटेशन) सत्राचे आयोजन करण्यात आले. तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि मनःशांती टिकवून ठेवण्यासाठी विविध कृती व उपक्रम राबविण्यात आले.
या सत्रामुळे अध्यापनाच्या व्यस्त दिनचर्येतून स्वतःसाठी वेळ काढण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. प्राध्यापकांच्या मानसिक सुदृढतेसोबतच कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आभार प्रा.रेश्मा अट्टारडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. सरोज भोळे, विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे, अकॅडमिक डीन डॉ. तुषार कोळी तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

