जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 उत्साहात
171 खेळाडूंचा सहभाग ; विविध वयोगटांत चुरशीच्या लढती
जळगाव (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव प्रायोजित ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026’ स्पर्धा 11 ते 13 सप्टेंबरदरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. जळगावचे वरिष्ठ खेळाडू स्व. अविनाश दामले यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
9, 11, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या एकेरी व दुहेरीसह खुल्या गटातील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी तसेच 35 वर्षांवरील गटातील सामने घेण्यात आले. जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांतील 171 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.



स्पर्धेतील विजेते व उपविजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनतर्फे आकर्षक चषक, सुवर्ण व रजत पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, राष्ट्रीय खेळाडू ब्रिजेश गौर, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, अमोल दामले, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे आणि प्रशिक्षिका दीपिका ठाकूर उपस्थित होते.
असा आहे निकाल
9 वर्षांखालील मुली एकेरीत गाथा देशमुख विजेती, तर अनन्या माहेश्वरी उपविजेती ठरली. 11 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनय पाटील, तर मुलींच्या एकेरीत सुमिती ठाकूर विजेते ठरले. 13 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत दर्शील मुनोत, मुलींच्या एकेरीत आरोही माहेश्वरी यांनी विजेतेपद मिळविले. 15 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनामय जोशी, तर मुलींच्या एकेरीत पलक महाजन विजेत्या ठरल्या. 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत नैतिक शिंदे, तर मुलींच्या एकेरीत ओवी पाटील विजेते ठरले. 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत फाल्गुन पाटील, तर मुलींच्या एकेरीत पूनम ठाकूर यांनी बाजी मारली.
खुल्या पुरुष एकेरीत तेजम केशव, तर महिला एकेरीत राजश्री पाटील विजेते ठरले. पुरुष दुहेरीत प्रणव पाटील-शुभम पाटील, महिला दुहेरीत गीता पंडित-रीत नाथानी, तर मिश्र दुहेरीत राजश्री पाटील-उमेर देशपांडे यांनी विजेतेपद पटकावले. 35 वर्षांवरील पुरुष एकेरीत चेतन वराडे, तर पुरुष दुहेरीत अतुल ठाकूर-चेतन वराडे विजेते ठरले. मिश्र दुहेरीत वृषाली धांडे-किर्ती मुनोत यांनी विजेतेपद मिळविले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे कौतूक केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य पंच दीपिका ठाकूर यांच्यासह सुफयान शेख, पूनम ठाकूर, अर्श शेख, फाल्गुन पाटील, तेजल भालेराव, वैष्णवी बोंडे, राखी ठाकूर व तेजम केशव यांनी पंच म्हणून काम पाहिले. विनीत जोशी यांनी सूत्रसंचालन तर किशोर सिंह यांनी आभार मानले.
