मनाला नवचैतन्य देणारे ‘सनराईज व सरेंडर’
जैन हिल्सवर अनोख्या ‘मॉर्निंग जर्नी’ मध्ये ध्यान, संगीत, फ्री-फ्लो डान्सचा जळगावकरांनी घेतला आनंद!
जळगाव (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘सनराईज व सरेंड द मॉर्निंग जर्नी’ या अनोख्या उपक्रमाची अनुभूती घेण्यात आली. ‘द अनप्लग प्रोजेक्ट’ च्या माध्यमातून केवळ निसर्गभ्रमंती, ध्यान, लाईव्ह म्युझिक, डान्स त्यानंतर उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरली.
जळगावकरांना ‘धावण्यापलीकडचा’ अनुभव!
निसर्गरम्य परिसरात धावणे आणि चालणे यासोबत ध्यान, सुमधुर संगीत आणि मुक्त नृत्याचा आनंद सहभागीांनी घेतला. ‘फक्त धावणे नाही, फक्त पार्टीही नाही’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा होता. ‘चला, हालचाल करूया, श्वास घेऊया, नाचूया आणि एकत्र येऊया’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता.
यांनी घेतला सहभाग
यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जिवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपवनसंरक्षक सौरेश सहाय, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सौ. निशा जैन, शोभना अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, प्रेम कोगटा, अथांग जैन, अंबिका जैन, अभेद्य जैन, आंचल जैन यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
व्यायाम, निसर्ग, संगीत आणि नृत्याचा अनोखा मिलाफ
‘फक्त धावणे नाही, फक्त पार्टीही नाही’ या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने व्यायाम, निसर्ग, संगीत आणि नृत्याचा अनोखा मिलाफ घडवला. शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणार्या या उपक्रमातून ‘चला, हालचाल करूया, श्वास घेऊया, नाचूया आणि एकत्र येऊया’ हा संदेश देण्यात आला. अंबिका जैन, जयंतिका आणि सनम यांच्या पुढाकारातून जळगावकरांना पहिल्यांदाच अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाची अनुभूती मिळाली.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात संगीताची रंगत
अहमदाबाद येथील नामवंत कलाकार पारस दलाल यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळाली. जळगावकरांसाठी ही सकाळ धावण्यापासून ध्यानधारणेपर्यंत आणि संगीतापासून नृत्यापर्यंतचा नवा अनुभव देणारी ठरली.
श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या श्रद्धाज्योत या श्रद्धास्थळापासून सकाळच्या प्रवासाला सुरुवात झाली. येथून श्रद्धाधाम परिसरात बोटींमध्ये तबला वादन, शास्त्रीय पियानो वादन तसेच मंगोलियन ध्वनीवाद्यांच्या माध्यमातून निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ध्यान आणि योगाच्या माध्यमातून मनःशांती साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
अंबिका जैन यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ.अश्विन झाला यांनी परिसराची माहिती दिली. यशस्वितेसाठी अंबिका जैन यांच्यासह जयंतिका, सनम आणि जगदीश चावला यांनी विशेष परिश्रम घेतले.
