जळगाव विभागात 6 ऑक्टोबर रोजी डाक अदालत


जळगाव (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : टपाल सेवांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग यांच्यातर्फे 6 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी चार वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

डाक विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात. या सेवांबाबत नागरिकांना येणार्‍या अडचणी व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने डाक अदालत आयोजित करण्यात येते. यामध्ये डाक विभागाचे अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करतात.

या डाक अदालतीमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर, सेवा, डाक वस्तू,पार्सल, बचत बँक, मनीऑर्डर आदी डाक सेवांशी संबंधित ज्या तक्रारींचे निराकरण तक्रार दाखल केल्यापासून सहा आठवड्यांच्या कालावधीत झालेले नाही, अशा तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव, पत्ता, तक्रारीचा विषय, तक्रार केल्याची तारीख तसेच ज्या अधिकार्‍याकडे मूळ तक्रार पाठविण्यात आली आहे, त्या अधिकार्‍याचे नाव व पद नमूद करणे आवश्यक आहे.

संबंधितांनी डाक सेवेसंबंधीची तक्रार दोन प्रतीत, अतिरिक्त प्रतीसह टी. एफ. तडवी, सहाय्यक अधीक्षक (मुख्यालय), अधीक्षक डाकघर यांचे कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव – 425001 या पत्त्यावर दि. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात. दि. 1 ऑक्टोबरनंतर प्राप्त झालेल्या तक्रारींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल; मात्र त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही, असे अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !