महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या कार्यकारिणीवर जळगावच्या विनीत जोशींची सलग दुसर्यांदा निवड
जळगाव (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची नागपूर येथे नुकतीच 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यात झालेल्या निवडणुकीत जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत विजय जोशी यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी सलग दुसर्यांदा निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे जळगावच्या बॅडमिंटन क्षेत्रात एक मानाचा तुरा खोवला गेला. त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनीही अभिनंदन केले आहे.
नागपूरात 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
महाराष्ट्रातील बॅडमिंटनच्या प्रशासकीय आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नागपूर येथे झाली. या सभेत असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली. विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणार्या पदाधिकार्यांमध्ये जळगावचे विनीत जोशी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली. गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात बॅडमिंटनच्या विकासासाठी विनीत जोशी कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील खेळाडूंना स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विविध स्पर्धांचे आयोजन, खेळाडू व प्रशिक्षकांना प्रोत्साहन देणे तसेच बॅडमिंटनचा ग्रामीण आणि शहरी भागात विस्तार करण्यासाठी ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारिणीवर सलग दुसर्यांदा मिळालेली संधी ही त्यांच्या कार्याची दखल म्हणता येईल. दरम्यान, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीत अरुण लखानी (नागपूर) यांची अध्यक्षपदी तर (डेप्युटी प्रेसिडेंट)शिरीष बोराळकर, मंगेश काशिकर (नागपूर) यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी तसेच सिध्दार्थ पाटील (छ.संभाजीनगर) यांची सचीवपदी व जगदीश जोशी यांची मानद खजिनदारपदी निवड झाली.
या निवडीनंतर जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे सह व्यवस्थापकीय संचालक तथा जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या बॅडमिंटन क्षेत्रात जळगावचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. राज्याच्या कार्यकारिणीवर सलग दुसर्यांदा मिळालेल्या संधीमुळे जळगावच्या बॅडमिंटन क्षेत्रातील उपक्रमांना आणि खेळाडूंच्या विकासाला आणखी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया अतुल जैन यांनी दिली.
