भडगाव तालुक्याची पैसेवारी 50 पैशांच्या आत करा : शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
वस्तुनिष्ठ पीक पाहणी व पीक कापणी प्रयोगाची मागणी
भडगाव (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : भडगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड तसेच काही भागांत झालेल्या अत्यल्प पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे भडगाव तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी 50 पैशांच्या आत निश्चित करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश रवींद्र पाटील यांनी भडगाव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काय आहे निवेदनाचा आशय ?
भडगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, भाजीपाला तसेच इतर खरीप पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला असून, शेतकर्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या निकषांनुसार वस्तुनिष्ठ पीक पाहणी व पीक कापणी प्रयोग करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
50 पैशांच्या आत करावी आणेवारी
प्रत्येक गावातील पिकांची प्रत्यक्ष व पारदर्शक पाहणी करून, शासनाच्या नियमानुसार आणि शेतकर्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग घेण्यात यावेत. तसेच पावसातील खंड व अन्य नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
50 पैशांच्या आत आणेवारी निश्चित झाल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकर्यांना शासनाच्या विविध मदत व सवलतींचा लाभ मिळण्यास मदत होऊ शकते त्यामुळे शेतकर्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून वस्तुस्थितीची योग्य नोंद करण्यात यावी तसेच पारदर्शक पद्धतीने पंचनामे व पीक कापणी प्रयोग करण्यात यावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
निवेदनात खरीप पिकांची अंतिम आणेवारी 50 पैशांच्या आत निश्चित करणे, पारदर्शक पीक पाहणी करणे, शेतकर्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग घेणे आणि पात्र शेतकर्यांना नुकसानभरपाई, पीकविमा व इतर अनुज्ञेय सवलतींचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
भडगाव तालुक्यातील शेतकर्यांची सद्यस्थिती आणि पिकांचे प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार भडगाव यांच्या वतीने नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी निवेदन स्वीकारले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अखिलेश रवींद्र पाटील, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, धनराज पाटील, युवा उपाध्यक्ष लिलाधर पाटील, सागर पाटील, डॉ.योगेश गोसावी, रामकृष्ण माळी, समाधान पाटील, सरदारसिंग पाटील, नरेंद्र पाटील, योगेश पाटील, संजय खैरनार, संजय पाटील, विकी पाटील, दिगंबर बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
