जळगावात उद्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधी मोर्चा : शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल
जळगाव (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपा दोन वाजता जळगावात जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जळगाव पोलिसांनी रविवारी दुपारी 12 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
जळगाव शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिक व वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षकांनी बैठक घेऊन मोर्चाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या.
रविवारी तात्पुरता वाहतूक मार्गात बदल
आकाशवाणी चौक ते न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने व एस.टी. बसेस या आकाशवाणी चौक ते कवयित्री बहिणाबाई उद्यान, रिंगरोड , गोकुळ स्वीट मार्ट, शाहू कॉम्प्लेक्सकडून न्यायालय चौकाकडे जातील.
न्यायालय चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने व एस.टी. बसेस या न्यायालय चौक, शाहू कॉम्प्लेक्स, गोकुळ स्वीट मार्ट, रिंगरोड, काव्यश्री बहिणाबाई उद्यानाकडून आकाशवाणी चौकाकडे जातील.
नेरी नाक्याकडून स्वतंत्र चौकाकडे येणारी वाहने ही नेरी नाका, पांडे चौक, सिव्हिल हॉस्पिटल, बेंडाळे चौक, चित्रा चौकमार्गे न्यायालय चौकाकडे जातील.
प्रभात चौकाकडून नेरीनाका/न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने ही प्रभात चौक, काव्यश्री बहिणाबाई उद्यान, रिंगरोड, गोकुळ स्वीट मार्ट, शाहू कॉम्प्लेक्स, न्यायालय चौक, चित्रा चौक, बेंडाळे चौक, नेरी नाक्याकडे जातील.
मोर्चा मार्गावर वाहने न आणण्याचे आवाहन
मोर्चाच्या कालावधीत नागरिकांनी व वाहन चालकांनी वरील पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गावर वाहने आणू नयेत आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


