पाळधीत बसखाली आल्याने सावदेतील विद्यार्थिनीचा मृत्यू


पाळधी (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : बसमधील गर्दीत चढताना खाली पडून बसच्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाळधी बसस्थानकात सोमवारी दुपारी दिड वाजता घडली. राजनंदिनी श्रीराम शिंदे (16, रा.सावदे, ता.एरंडोल) असे मृताचे नाव आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून विद्यार्थ्यांसाठी जादा बस सुरू करण्याची मागणी होत आहे.

बस चालकाची होणारी चौकशी
अपघाताची जवाबदारी बस चालक मिलिंद पाटील यांच्यावर निश्चित करण्यात आली असून त्यांची आता खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे शिवाय विद्यार्थ्यांसाठी पाळधी-रवंजा ही वाढीव बस या मार्गावर मंगळवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले.

गर्दीतून पडल्याने दहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू
राजनंदिनी ही पाळधी येथील स.न. इंबर विद्यालयात इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होती शिवाय ती पाच किलोमीटर अंतरावरील सावदे गावातून रोज शाळेत ये-जा करत होती. सोमवारी शाळा दुपारी 12 वाजता सुटल्यानंतर ती बसस्थानकात दीड वाजेच्या गाडीची प्रतीक्षा करीत असताना जळगाव-रवंजा बस (एम.एच.40 एन. 9641) आली मात्र त्यात आधीच 30 ते 40 प्रवासी होते. त्यात पाळधीहून 70 ते 80 शाळकरी विद्यार्थी व इतर प्रवासी चढले. गाडी फुल्ल झाल्यानंतर चालकाने गाडी सुरू केली. या वेळी झालेल्या रेटारेटीमुळे राजनंदिनी बाहेर फेकली जाऊन खाली पडली. याचवेळी तिच्या डोक्यावरून बसचे मागील चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विद्यार्थिनीच्या पश्चात मजुरी करणारे वडील, आई, दहा वर्षांची बहिण व चार वर्षाचा लहान भाऊ असा परिवार आहे. सोमवारी रात्री तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !