जळगावात 32 लाखांचे सोने-चांदीचे दागिन्यासह रोकड महिलेला परत
घरफोडीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांकडून कौशल्याने तपास
जळगाव (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : जळगाव एमआयडीसी हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करीत पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तब्बल 32 लाख 18 हजार 800 रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने हा ऐवज मूळ फिर्यादी महिलेला एमआयडीसी पोलिसांना परत केला. जळगाव जिल्हा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे.
एमआयडीसी हद्दीत झाली होती घरफोडी
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाजन नगर, रामेश्वर कॉलनी परिसरातील संगीता राजू घुगे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 8 सप्टेंबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांच्या शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर फिर्यादी महिलेला तिचा मुद्देमाल परत मिळावा यासाठी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशाने मुद्देमाल परत
न्यायालयाने 8 ऑक्टोबर 2026 रोजी मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व पंचांसमक्ष एकूण 32 लाख 18 हजार 800 रुपये िंकमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मूळ फिर्यादी संगीता राजू घुगे यांना सुपूर्द करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी तपास
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली. घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेद्वारे पीडित महिलेला परत मिळवून देणे, ही जळगाव जिल्हा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.


