यावलला पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार संतापले
दोन ग्रामसेवक गैरहजर ; बीडीओंना सुनावले खडेबोल ; पत्रकारांना आमंत्रण नाही
यावल (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : यावल पंचायत समितीत सोमवारी घेण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दोन्ही आमदार पंचायत समिती प्रशासनावर चांगलेच संतापले. बैठकीत केवळ ऑफीसमध्ये बसून अहवाल तयार करून तो सादर करून चालणार नाही, गावा-गावात जावून या दुष्काळी परिस्थितीत आढावा घ्या, अशा शब्दात कान उघाडणी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीसाठीच्या या बैठकीत दोन ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने गटविकास अधिकार्यांना खडे बोल सुनावण्यात आले. संबंधितांवर कारवाईच्या सुचना करण्यात आल्या. विशेष म्हणजे गत आढावा बैठकीप्रमाणे या बैठकीला पुन्हा पत्रकारांना आमंत्रण देण्यात न आल्याने आमदारांनी पत्रकारांना बोलावले.
पाणीटंचाईचा घेतला आढावा
यावल पंचायत समितीमध्ये तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक आयोजित घेण्यात आली. या बैठकीत आमदार अमोल हरिभाऊ जावळे, चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती. यावल तालुक्यात झालेल्या पावसाची टक्केवारी 79 टक्के सांगण्यात आली तर आमदारांना सादर केलेल्या पत्रात पावसाची टक्केवारी वेगळीच होती तसेच तुर्त तालुक्यात कुठेच पाणीटंचाई नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेंद्र गिरी यांनी सांगितले. यादरम्यान बैठकीत उपस्थित ग्रामसेवकांना शिरसाड, हंबर्डी आणि दहिगाव या गावात याच वर्षी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. सादर केलेला आढावा व येथे उपस्थित ग्रामसेवक देत असलेली माहिती यात विसंगती दिसत असल्याने दोन्ही आमदार चांगलेच संतापले. त्यांनी गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना खडेबोल सुनावले.





दोन ग्रामसेवकांवर होणार कारवाई
सर्व ग्रामसेवक आले आहेत का? असे विचारले असता दोन ग्रामसेवक गैरहजर असल्याचे दिसून आल्याने गटविकास अधिकारी म्हणून तुमचा प्रशासनावर वचक नाही का?, असे खडे बोल सुनावण्यात आले. अनुपस्थित ग्रामसेवकांवर कारवाई केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीमध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, माजी सभापती नारायण चौधरी, सूर्यभान पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, यावल नगरपालिकेच्या भाजपा गटनेता नंदा महाजन, उमेश फेगडे, भरत चौधरी सह ग्रामसेवक, तलाठी, मंडळाधिकारी व विविध गावाचे सरपंच, सदस्य, प्रशासक उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर सपकाळे यांनी केले.
