मुक्ताईनगरातून तवेरा लांबवणार्या अमरावतीतील कुख्यात आरोपीला अटक
मुक्ताईनगर पोलिसांची यशस्वी कारवाई ; सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वाहनासह आरोपीचा शोध
मुक्ताईनगर (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून महागडे तवेरा वाहन चोरीला गेल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनासह आरोपीचा माग काढत अकोल्यातील कुख्यात आरोपीला अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद युनूस (28, उत्तमचंद प्लॉट, तारफाईल, ह.मु.पॅराडाईज कॉलनी, वलगाव रोड, नवसारी, अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वाहन चोरीने खळबळ
मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून 3 ते 4 रोजीच्या मध्यरात्री चोरट्यांनी तवेरा (एम.एच.19 बी.सी.0092) वाहन लांबवल्याची तक्रार वाहन मालक शेख दानिश शेख साबीर यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी विशेष तपास पथक स्थापन करीत तपास सुरू केल्यानंतर वाहन मुक्ताईनगरहून भुसावळ व तेथून शेगावकडे गेल्याचे निष्पन्न झाले.





शेगावातील पार्किंगमध्ये पाच तास वाहन
पुढील तपासात चोरीचे वाहन शेगाव शहराच्या दिशेने गेल्याचे आढळले. शेगाव परिसरातील फुटेज तपासताना वाहन श्री गजानन महराज संस्थेच्या पार्किंग परिसरात सुमारे पाच तास वाहन उभे होते व तेथून वाहन अमरावतीच्या दिशेने गेल्याचे व तेथून पुढे कुठेही गेले नसल्याचे स्पष्ळ होताच अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. अभिलेखावरील गुन्हेगारांची चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे चोरीच्या वाहनाचा शोध सुरू असताना अमरावतीच्या नवसारी परिसरात वाहन आढळले व पोलिसांनी पाळत ठेवल्यानंतर संशयीत मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद युनूस (28, उत्तमचंद प्लॉट, तारफाईल, ह.मु.पॅराडाईज कॉलनी, वलगाव रोड, नवसारी, अमरावती) वाहनात बसताच त्यास वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
कुख्यात आरोपीविरोधात अनेक गुन्हे
अटक केलेल्या आरोपीविरुद्ध अकोला शहरासह आजूबाजूच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. या गुन्ह्यांतील त्याच्या संभाव्य सहभागाबाबत पुढील तपास सुरू आहे.
या पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात हवालदार कल्पेश आमोदकर, हवालदार असीम तडवी, मुकेश महाजन, रितेश चव्हाण, स्वप्नील पवार, अक्षय वाढे आदींच्या पथकाने केली.
