रावेरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक : दोन्ही आमदारांनी विचारला जाब
दहा दिवसांत पुन्हा बैठक घेण्याच्या सूचना
रावेर (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : रावेर तालुक्यात आगामी काळात उद्भवणार्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रावेर तहसील कार्यालयात 67 गावांमधील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत ? असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल जावळे यांनी उपस्थित केल्यानंतर काही प्रश्नांवर संबंधित अधिकार्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत दहा दिवसात पुन्हा बैठक घेण्याच्या सूचना केल्या.
विविध विषयांवर चर्चा
रावेर तालुका दुष्काळसदृश परिस्थितीला सामोर जात असताना आगामी काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाने कोणती तयारी केली आहे? याबाबत आमदारांनी माहिती मागवली. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता, शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे आणि नुकसानभरपाई यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय असावा, असा मुद्दा उपस्थित झाला.





ठोस उपाययोजनांची माहिती देण्याचे आदेश
प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी समन्वय साधत जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि कृषी विभागाच्या कामकाजाबाबत माहिती मांडली मात्र काही मुद्यांवरअधिकार्यांकडून समाधान कारक माहिती मिळाली नसल्याने संबंधित विभागांनी ठोस उपाय योजनांसह पुढील बैठकीत माहिती सादर करावी, अशा सूचना करण्यात आल्या. आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात व नागरिकांसह शेतकर्यांना दिलासा द्यावा यावर बैठकीत भर देण्यातआला. पुढील दहा
दिवसांत पुन्हा बैठक घेऊन पाणीटंचाई संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला नगराध्यक्षा संगीता महाजन, बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, नगरसेवक पद्माकर महाजन, सावदा मंडळ प्रभारी विजय महाजन, शिवसेना पदाधिकारी राहुल पाटील, निंबोल तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, पवन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अमोल महाजन, भाजपचे कोषाध्यक्ष अनंत महाजन (रसलपूर), भाजप कार्यकर्ते योगेश महाजन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
