अमळनेरातील सागर कोळीची हद्दपारी कायम : आयुक्तांनी फेटाळले अपिल
अमळनेर (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील सागर अशोक कोळी याचे अपील आयुक्त प्रवीण गेडाम यांनी फेटाळून लावत उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी दोन वर्ष हद्दपार करण्याचा निर्णय कायम ठेवला.
आयुक्तांनी अपिल फेटाळले
मांडळ येथील सागर अशोक कोळी याच्याविरुद्ध खून, गौण खनिज चोरी तथा खुनाचा प्रयत्न करणे असे विविध गुन्हे दाखल होते. त्याच्यापासून कायदा व सुव्यवस्थेला धोका असल्याचे व लोकांमध्ये दहशत असल्याने मारवड पोलीस स्टेशनतर्फे सागर कोळीचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी यावर सुनावणी घेऊन दोन्ही पक्षाचे ऐकून घेतल्यावर त्यांनी सागर कोळी यास जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.





या निर्णयाविरुद्ध सागर कोळी याने नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे अपील दाखल केले. त्यावर आयुक्त गेडाम यांनी सुनावणी घेतली. त्यात सागरवर खुनाचा गुन्हा दाखल असून त्याची अटी शर्तीवर जामिनावर मुक्तता करण्यात आल्यानंतर गौण खनिज चोरी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानेच त्याला हद्दपार राहू द्यावे, असे मुद्दे मांडण्यात आल्याने आयुक्त गेडाम यांनी उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळेंचा यांचा निर्णय कायम ठेवला.
