पिकअपची दुचाकीला धडक : सातगाव डोंगरीच्या जावयासह सासूचा जागीच मृत्यू
जामनेर (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : भरधाव बोलेरो पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन सासूसह जावयाचा जावयाचा जागीच मृत्यू झाला. विमलबाई ओंकार परदेशी (वय 75, रा.गोंडखेड, ता.जामनेर) आणि राजू बाबुलाल परदेशी (वय 55, रा.सातगाव डोंगरी, ता.पाचोरा) अशी मृतांची नावे आहे. हा भीषण अपघात जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर रस्त्यावरील गोगळी नदीच्या पुलावर घडला.
मुलीकडे महिलेचे वास्तव्य
विमलबाई परदेशी यांच्या पतीसह दोन मुलांचे यापूर्वीच निधन झाल्याने त्या सातगाव डोंगरी येथे आपल्या विवाहित मुलीसह जावयाकडे वास्तव्यास होत्या. नवरात्रोत्सवानिमित्त गोंडखेड या त्यांच्या मूळ गावी भावकीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याने या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जावई राजू परदेशी यांच्यासह दुचाकीवरून (क्र.एम.एच. 19 ई.एच.0499) गोंडखेडकड निघाल्यानंतर शेंदुर्णी-पहूर रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्ग्यासमोरील गोगळी नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीची बोलेरो पिकअपशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने विमलबाई आणि राजू परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला.





एकाच अपघातात सासू आणि जावयाचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताच्या घटनेने गोंडखेड आणि सातगाव डोंगरी परिसरात शोककळा पसरली.
