धुळ्यात अवैध धंदे आणि अवैध सावकारी करणार्यांना पोलिसांचा सक्त इशारा!
पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांची कठोर कारवाईची सूचना ; अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश
धुळे (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : धुळे शहरातील अवैध व्यवसाय, सट्टा, जुगार, क्लब तसेच अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी धुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी अशा अवैध धंद्यांमध्ये सहभागी असणार्यांना हे व्यवसाय तातडीने बंद करण्याची सक्त सूचना दिली अन्यथा कठोर कारवाईसत्र अवलंबण्याचा यावेळी इशारा दिला.





अधीक्षक कार्यालयात बोलावत दिली तंबी
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळे शहरातील अवैध व्यवसाय करणार्या आरोपींना बोलावून त्यांना अवैध धंदे बंद करण्याबाबत समज देण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपस्थित होते.
तर कठोर कारवाई
पोलिसांच्या नजरेआड राहून अवैध धंदे किंवा अवैध सावकारी सुरू ठेवल्यास संबंधितांवर छापे टाकून प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. अवैध व्यवसाय, जुगार अड्डे, क्लब आणि मटका केंद्र चालविणार्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
अवैध सावकारीविरोधातही कठोर भूमिका
नागरिकांची पिळवणूक करणार्या अवैध सावकारांविरोधातही पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. सावकारांनी शेतकरी, शेतमजूर आणि इतर गरजू नागरिकांकडून अवाजवी व्याज आकारू नये, तसेच व्याजाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारची तक्रार असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
धुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. यापूर्वी अवैध व्यवसाय करणारे तसेच विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले 50 वर संशयीत तसेच अवैध सावकार यावेळी उपस्थित होते.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
धुळे शहरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे किंवा अवैध सावकारी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
