इतिहासात प्रथमच रावेर शहरात खानदेश वहीगायन लोककलावंताचा मेळावा
चार ज्येष्ठ कलाकारांचा ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान
रावेर (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : खानदेशच्या पारंपरिक लोककलेचा वारसा जपणार्या वहीगायन कलेला प्रोत्साहन देण्यासाठी रावेर शहरात प्रथमच तालुकास्तरीय वहीगायन लोककलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. खानदेश वहीगायन लोककलावंत परिषद आणि रावेररातील छत्रपती शिवाजी महाराज वही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी श्री संत सावता माळी मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. या मेळाव्याच्या प्रारंभी शहरातून काढण्यात आलेल्या आकर्षक शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
यांचा होता सहभाग
या मेळाव्याला विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन, खानदेश वहीगायन लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, रावेरच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, नगरसेवक पद्माकर महाजन, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, ह.भ.प.कांतीलाल महाजन, ई.जे.महाजन, नगरसेविका राजेश शिंदे, बंटी महाजन, अर्चना पाटील, योगीता महाजन, सीमा जमादार, सपना महाजन, नगरसेवक नितीन महाजन, अमोल पाटील, अशोक गायकवाड, डी.डी.वाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हाभरातील 17 वहीगायन मंडळांचे पदाधिकारी आणि लोककलावंतांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला.





ज्येष्ठ लोककलावंतांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
वहीगायन कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या धनू महाजन, यशवंत शिंदे, ज्येष्ठ लोककलावंत रमेश पाटील आणि उघडू पाटील यांना ‘वहीगायन लोककलावंत जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सन्मानामुळे पारंपरिक लोककलेसाठी आयुष्यभर योगदान देणार्या कलावंतांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
17 मंडळांच्या सादरीकरणाने रंगला मेळावा
मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित सर्वच वहीगायन मंडळांनी सभागृहात आपापल्या कलेचे सादरीकरण केले. पारंपरिक वहीगायनातून खानदेशच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. या आगळ्या-वेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोककलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत होती. प्रस्तावना दीपक पाटील यांनी केली. पाहुण्यांचे स्वागत वहीगायन परिषदेचे रावेर तालुकाप्रमुख गणेश महाजन आणि दिनेश महाजन यांनी केले. पारंपरिक लोककलेचा गौरव, ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान आणि विविध मंडळांच्या सादरीकरणामुळे हा मेळावा रावेरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
