यावलच्या सरस्वती विद्यामंदिरात तीन दिवसीय शारदोत्सवाची ‘कोरडी माती, ओले डोळे’ नाटिकेने झाली सांगता
यावल (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : शहरातील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात तीन दिवसीय शारदोत्सव विविध शैक्षणिक, क्रीडा, बौद्धिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या संगमाने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री शारदेची विधिवत स्थापना व पूजन करण्यात आले, दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देणार्या क्रीडा व बौद्धिक स्पर्धा पार पडल्या तर तिसर्या दिवशी ’कोरडी माती, ओले डोळे’ या दुष्काळग्रस्त वास्तव दर्शवणार्या संवेदनशील नाटिकेसह विविध सांस्कृतिक कलाविष्कारांनी महोत्सवाची सांगता झाली. श्याम शास्त्री नाईक यांनी तीनही दिवस पूजनाचे धार्मिक विधी भक्तिभावाने पार पाडले असून, ज्ञान, कला आणि संस्कृतीचा हा तिहेरी संगम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.





‘कोरडी माती, ओले डोळे’ नाटिकेने केली सामाजिक जाणीव जागृत
यंदाच्या शारदोत्सवाचे मुख्य आकर्षण दुष्काळाच्या गंभीर समस्येवर आधारित देखावा आणि ‘कोरडी माती, ओले डोळे’ या नाटिकेचे प्रभावी सादरीकरण ठरले. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या संकटाची तीव्रता, शेतकर्यांचे हाल, पाण्याची भीषण टंचाई आणि त्याचा संपूर्ण समाजजीवनावर होणारा गंभीर परिणाम यांचे अत्यंत संवेदनशील व वास्तववादी चित्रण विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून रेखाटले. या संकल्पनात्मक सादरीकरणाला विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधन घडवून आणण्यात या उपक्रमाने मोलाची भूमिका बजावली
गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांचा गौरव
सांगता समारंभासाठी यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. सी. ठाकूर होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांना राज्यस्तरीय प्रशासकीय अधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात फिरोज पठाण म्हणाले, आपला देश कृषीप्रधान असल्याने विद्यार्थ्यांनी शेतीचे संवर्धन आणि शेतकर्यांच्या प्रश्नांविषयी सदैव संवेदनशील राहिले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नियमित अभ्यास, योग्य अभ्याससवयी, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा अवलंब करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
तीन दिवसीय महोत्सवात आयोजित विविध नृत्य, नाटिका व कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांचा गौरव
या शारदोत्सवाचे उत्सवप्रमुख म्हणून मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर यांनी तर उपप्रमुख म्हणून एम. आर. तांबोळी यांनी जबाबदारी पार पाडली. सांगता समारंभास संचालक जी. डी. कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक एस. एम. जोशी, ज्येष्ठ शिक्षक एन. डी. भारुडे, एस. बी. चंदनकार, डी. एस. पाटील, डी. पी. जोशी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक एन.डी.भारुडे तर सूत्रसंचालन बी.पी.वैद्य यांनी तसेच आभार एस.बी.चंदनकार यांनी मानले. शारदोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
