जामनेर तालुक्यात भीषण अपघात : एकाच कुटूंबातील सहा जण ठार

मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह दाम्पत्य व भाऊ-बहिणीचा समावेश


जामनेर (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. हा भीषण व मन हेलावणारा अपघात जामनेर-बोदवड मार्गावरील मालदाभाडी गावाजवळ गुरुवार, 15 रोजी घडला. अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह दोन लहान मुलांचा समावेश आहे.

ट्रकच्या धडकेने अपघात
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जामनेर ते बोदवड या मार्गावर मालदाभाडी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. या मार्गावरून प्रवास करणार्‍या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीवरील सहाही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या बाळासह दोन लहान चिमुकल्यांसह दाम्पत्य व भाऊ-बहिणीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.






लहान मुलांसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. एका कुटुंबातील अनेक सदस्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक कार्यवाही केल्यानंतर मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी जामनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मयत कुटूंब हे मध्यप्रदेशातील असल्याने मृतांची नावे, त्यांची सविस्तर ओळख अद्याप समोर आलेली नाही. मृतांचे नातेवाईक आल्यानंतर मृतांची नावे अधिक स्पष्ट होणार आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !