रावेर पोलिसांची कामगिरी : शेतातील वीज तारा चोरी करणार्या विवरेतील चोरट्यांना बेड्या
रावेर (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : रावेर तालुक्यातील शेतशिवारातून वीजतार चोरी करणार्या विवरेतील संशयीतांना रावेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून 26 किलो वजनाच्या चोरीच्या वीजतारा जप्त करण्यात आल्या आहेत. जुबेर रमजान तडवी व शरीफ राजू तडवी (विवरे, ता.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
वीजतार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
अग्रवाल पॉवर प्रा.लि.साईटचे सुपर वायझर राजेंद्र रामदास ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार 50 हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रीक पोलवरील तारा चोरीस गेल्या प्रकरणी 6 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्यांनी भोर शेत-शिवारातील गट क्रमांक 861 मधील भोर ते अजंदा दरम्यान रस्त्यावरील पोलवरून 50 हजार रुपये किंमतीच्या अॅल्युमिनिअम तारा लांबवल्या होत्या.





गस्तीदरम्यान पोलिसांनी कारवाई
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना 14 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री गस्त दरम्यान रावेर-अंजदा रोड परिसरात काही संशयित फिरत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी 50 हजार रुपये किंमतीची अॅल्युमिनिअम तार चोरीच कबुली दिली 26 किलो वजनाचा मुद्देमाल काढून दिला. आरोपींची एका दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात चोरीच्या वीजतारा कापून त्यांची विक्री करण्यात आल्याची शक्यता आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक संदीप बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक अमुल बच्छाव, हवालदार नितीन आमोदकर, विजय चौधरी, गुन्हे शोध पथकातील हवालदार समाधान ठाकूर, कॉन्स्टेबल विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील, रुबाब तडवी आदींनी केली. तपास पोलीस हवालदार विजय चौधरी करीत आहेत.
संशयास्पद हालचाली आढळल्यास द्या माहिती
शेतातील वीजपंप, वीजतारा आणि विद्युत साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे अशा घटनांबाबत शेतकर्यांनी सतर्क राहून काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन रावेर पोलिसांनी केले आहे.
