राज्यभरात बॅग लिप्टींग करणारी आंध्र प्रदेशातील टोळी मुक्ताईनगर पोलिसांच्या जाळ्यात
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूसांसह दरोड्याचा डाव उधळला : त्रिकूट जाळ्यात ; दोन संशयीत पसार
मुक्ताईनगर (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : मुक्ताईनगर पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळत आंध्र प्रदेशातील त्रिकूटांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाईल फोन, मोटारसायकल आणि इतर साहित्य असा एकूण दोन लाख 47 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील एस.एस.कॉलेज परिसरात करण्यात आली. आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचाही कसून शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेतील टोळी बॅग लिप्टींगमध्ये माहीर असून राज्यभरातील गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांची कारवाई
मुक्ताईनगरच्या एस.एस.कॉलेज परिसरात दोन मोटारसायकलींवरून पाच अनोळखी इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता दोन संशयीत दुचाकी सोडून पसार झाले तर अन्य तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.





आंध्रातील टोळीला अटक
पोलसांनी मेकला प्रसन्नकुमार मेकला दास (रा.करपल्ला थिपा, बोगले धामा वरम, जिल्हा नेल्लूर, आंध्रप्रदेश), धरसिंग देरध धोडीडी उर्फ प्रसिंग प्रसाद गुटेड्डी (बिटरगुंडा, जिल्हा नेल्लूर, आंध प्रदेश) व मेकल विरास्वामी कोंडाया (बिटरगुंडा, जिल्हा नेल्लूर, आंध्र प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
पिस्तूल, काडतुस जप्त :दहा बनावट नंबरप्लेट जप्त
या कारवाईत पोलिसांनी एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन अँड्रॉइड मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि रोख पाच हजार सातशे रुपयांची रोकड जप्त केली. एकूण दोन लाख 47 हजार 300 रुपये किंमतीचा हा मुद्देमाल आहे. आरोपींच्या ताब्यातून
105 लोखंडी छरे, एक स्क्रू ड्रायव्हर, दोन कापडी टोप्या, टी-आकाराचे धारदार हत्यार आणि वेगवेगळ्या क्रमांकांच्या 10 नंबर प्लेट्सही जप्त करण्यात आल्या.
आरोपी बॅग लिप्टींगमध्ये राज्यभरात कुख्यात
अटकेतील आरोपींची टोळी ही बँकेबाहेर पाळत ठेवून नागरिकांना वाहनासह रोकड पडल्याचे सांगत व नागरिकांचे लक्ष विचलीत होताच टोळीतील सदस्य रोकड अथवा बॅग असलेली पिशवी क्षणात लांबवून पसार होतात, अशी या टोळीची एमओबी आहे. या टोळीविरोधात राज्यभरात 20 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींचे फुटेज समोर आल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांशी आतापर्यंत 12 पोलीस ठाण्यांनी संपर्क साधल्याने राज्यभरात आरोपींच्या टोळीने धुमाकूळ घातल्याचे स्पष्ट आहे. पाचोरा शहरासह जालना, परभणी, पुणे, शिक्रापूर आदी भागातील गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात हवालदार कल्पेश आमोदकर, असीम तडवी, रवींद्र धनगर, मुकेश महाजन, रितेश चव्हाण, गोविंदा पवार आदींच्या पथकाने केली. तपास सहा.निरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.
