शिरसोलीनजीक विहिरीत तोल जावून पडल्याने 50 वर्षीय शेतकर्याचा मृत्यू
जळगाव (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : शेतातील नादुरुस्त पाण्याची मोटार विहिरीतून बाहेर काढत असताना तोल गेल्याने विहिरीत शेतकर्याचा मृत्यू झाला. शिरसोली येथील बारी नगर परिसरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली. विश्वनाथ भिका ताडे (50) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
विश्वनाथ ताडे हे गुरुवारी दुपारी आपल्या शेतात कामासाठी गेले असताना दुपारी साधारण दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ते विहिरीतून नादुरुस्त झालेली पाण्याची मोटार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्यांचा तोल गेला. घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने विश्वनाथ ताडे यांना विहिरीतून बाहेर काढून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. ताडे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.





कुटूंबात दुःखाची मालिका
काही दिवसांपूर्वीच विश्वनाथ ताडे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चुलत भावाचाही मृत्यू झाला होता. या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच विश्वनाथ ताडे यांचाही मृत्यू झाल्याने महिनाभराच्या कालावधीत कुटुंबातील तिसर्या व्यक्तीला गमावण्याची वेळ आल्याने शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
