भुसावळातील नर्मदा कॉलनीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखीचा मृतदेह आढळला
नर्मदा कॉलनीतील रेल्वेच्या जुन्या वसाहतीतील घटना दुर्गंधीमुळे उघड
भुसावळ (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील नर्मदा कॉलनीतील रेल्वेच्या जुन्या वसाहती कुजलेल्या अवस्थेतील इसमाचा मृतदेह आढळल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. दुर्गंधी सुटल्यानंतर रहिवाशांनी शहर पोलिसांना माहिती कळवताच यंत्रणेने धाव घेतली. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाची ओळख पटवण्यासह घटनेच्या नेमक्याचा कारणांचा शोध घेतला जात आहे.
रिकाम्या वसाहतीत मृतदेह
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या नर्मदा कॉलनी परिसरात, वाचनालयाच्या मागील बाजूस रेल्वेची जुनी वसाहत आहे. रेल्वे प्रशासनाने या परिसरातील अतिक्रमणे हटविल्यानंतर काही जागा रिकाम्या असून सात क्रमांकाच्या पोलीस चौकीच्या मागील बाजूस एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती रहिवाशांना समजताच त्यांनी शहर पोलिसांना सूचित केले. शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह कर्मचारी व फॉरेन्सिक पथक आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारण आणि कालावधी शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.





यापूर्वीही आढळले कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी नाहाटा चौफुलीजवळील समांतर रस्त्यालगत असलेल्या नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्याआधी भुसावळ रेल्वे यार्डातील एका गोदामात विदर्भातील अकोट परिसरातील योगेश विजय वाघधरे (23) वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. या घटनांनंतर आता नर्मदा कॉलनीतील जुन्या रेल्वे वसाहतीत मृतदेह सापडल्याने शहरात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
