भुसावळातील सेवानिवृत्त पोलिसाचा अपघाती मृत्यू : पिकअपवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा


भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : भुसावळ पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलिसाचा भरधाव पिकअपच्या धडकेने मृत्यू झाला होता. अपघाताची ही घटना 1 ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी 14 रोजी अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश आनंदराव पाचपांडे (67, नाहाटा कॉलेजजवळ, पियुष कॉलनी, भुसावळ) असे मयत सेवानिवृत्त कर्मचार्‍याचे नाव आहे.

घराकडे येत असताना वाहनाची धडक
सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश पाचपांडे हे 1 ऑक्टोबर रोजी अ‍ॅक्टीव्हा दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.3366) वरून राजस्थान मार्बलकडून आपल्या घराकडे निघाले असताना पिकअप चारचाकी वाहन (एम.एच.48 ए.जी.8660) वरील अज्ञात चालकाने जबर धडक दिल्याने पाचपांडे हे गंभीर जखमी झाले. स्थानिक बाजारपेठ व वाहतूक शाखेला अपघाताची माहिती मिळताच सहा.निरीक्षक राहुल भंडारे व सहकार्‍यांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत बाजारपेठ पोलिसात जमा केली होती तर जखमी पाचपांडे यांना विघ्नहर्ता रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.45 वाजता प्राणज्योत मालवली.






14 दिवसानंतर अपघाताचा गुन्हा
मयत पाचपांडे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या पत्नी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शैलजा पाचपांडे यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चारचाकी वाहन (एम.एच.48 ए.जी.8660) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय जगन सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !